मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्पष्टच सुनावणे आहे. कुणबी आणि क्षत्रिय देखील आम्हीच आहोत, आमच्या लेकरांना आरक्षणाची गरज आहे. ज्यांना आरक्षण घ्यायचे नाही ते घेणार नाहीत आणि ज्यांना घ्यायचे ते घेतील. आपण नारायण राणे साहेबांचा सुरुवातीपासूनच आदर करत आलोय, पण त्यांनी नको तेथे बोलू नये.ज्यांना आरक्षण घ्यायचंय ते घेतील ज्यांना नको ते नाही घेणार. कारण आमच्या लेकरांचा आरक्षणाचा प्रश्न आहे. कोणी चुकला की आपण कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
जरांगे यांनी स्पष्ट सांगितले की नारायण राणेंनी हा आमचा प्रश्न सोडवावा. एसईबीसी अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. त्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही.ओबीसीच्या धर्तीवर एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ते मिळालेले नाही. एसईबीसीच्या शिष्यवृत्ती मिळण्यासाठी कोणत्या मंत्रालयाला अर्ज करायचे हेच स्पष्ट नाही सांगितलेले. मुलींना मोफत शिक्षण दिले त्यात सुद्धा अनेक लफडे आहेत. कॉलेज म्हणतंय की अद्याप तो जीआर लागू केलेला नाही. नारायण राणे यांनी बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा शिष्यवृत्तीचा विषय मांडून सोडवावा असं माझं त्यांना टीव्ही ९ मराठीच्या माध्यमातून आवाहन आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणात संभाजीनगरात मोर्चा काढण्यात आला आहे. याबाबत विचारता ते म्हणाले की खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहे. तो सुटता कामा नये. खंडणी मागायला लावणारा, गेलेले आणि फोन करणारे हे सर्व एकच आहेत. खंडणी मागणारे, हत्या करणारे आणि खंडणी मागायला लावणाऱ्यांना पाठबळ देणारा कोण ? हा सुद्धा शोधला पाहिजे अशीही मागणी मराठा आंदोलक जरांगे यांनी केली आहे.
कोण पालकमंत्री झाला काय आणि नाही झाला काय आणि 50 झाले तरी मला काही देणं घेणं नाही. पण बीडचे पालकमंत्री अजितदादा झाले हे बरे झाले, इथे पीकविमा, हार्वेस्टर अनुदान असे अनेक घोटाळे इथे आहेत. हे काढून काढून अजितदादांना कंटाळा येईल, पण ते सफाया करतील अशी मला खात्री आहे असेही जरांगे यांनी म्हटले आहे.यातील सर्व आरोपी सुटणार नाहीत अशी अपेक्षा आहे आणि ते व्हायला हवे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
तुम्ही पन्नास मंत्रिपद घ्या आम्हांला काही हरकत नाही. आम्ही ते मोडायला खमके आहोत. खून करून मोर्चे काढता, आंदोलन करतात, त्यामुळे राज्याला कळतं जातीवादी कोण आहेत. आतापर्यंत मराठ्यांनी आरोपी गुंडांच्या बाजूने मोर्चे काढलेले नाहीत. मात्र तुम्ही ते करताय त्यामुळे राज्याला कळलं कोण जातीवादी आहेत. वाल्मिक कराडकडे असलेली प्रॉपर्टी कोणाची तरी आहे असा टोलाही मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला आहे.
त्याच्या एकट्याचंच एवढं मोठं घबाड आहे का? की कणगी भरून आणल्यासारखं घबाड आहे. म्हणजे त्याला इतकी पोरं आहेत का? एवढी प्रॉपर्टी करायला. कोणाचं तरी मोठ घबाड आहे, पण ते त्याच्या नावावर ठेवलं आहे. ज्याच्यासाठी पाप केलं, खंडणी मागितली, पैसे मागितले. फ्लॅट जमिनी इतकं त्याला काय करायचं होतं? ही कोणाची तरी प्रॉपर्टी आहे ती त्याच्याकडे ठेवली आहे. मात्र एक दिवस असा येईल की ही प्रॉपर्टी ज्याच्या नावावर आहे तो सुद्धा जेलमध्ये जाईल असाही इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांनी ती त्यांना परत देऊन टाकावी नाहीतर तुम्ही अडचणीत याल.लोकं कापून, मारून हे पैसे कमवले आहेत त्यामुळे यांच्यासाठी कोणी जेलमध्ये जाणार नाहीत.
हा एवढा मोठा पैसा जमा केला आहे त्यामुळे ईडी लवकरच मागे लागेल. सध्या थंडीचे दिवस आहेत किंवा ईडीच्या गाडीतील पेट्रोल संपले असेल म्हणून ते आले नाहीत मात्र ते येतील आणि त्यांनी यावं असेही जरांगे यांनी यावेळी म्हटले आहे. तुम्ही पाप करता आणि पुन्हा वैद्यनाथाला आणि ओबीसीला पांघरून घालायला बोलावता. वैद्यनाथाचे नाव घेतलं असेल तर प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून सांगावं. धनंजय देशमुख यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देत आहे हे दिसत नाही का? लाभार्थी टोळीमुळे बीडचं वातावरण खराब झालं आहे. ही टोळी विनाकारण चुकीचे शब्द वापरून धनंजय मुंडे आणि समाजाला अडचणीत आणत आहेत.या टोळीला त्यांनी आवर घालावा. जर ते थांबवले नाही तर याचा अर्थ त्यांचा पाठिंबा आहे असा होतो. खून करणाऱ्या आरोपीला फाशी मिळावी यासाठी सर्वात आधी तुम्ही मोर्चा काढायला हवा होता तुमची टोळी आणि तुम्ही एवढेच तुम्ही आयुष्य समजताय बाकी कोणी नाही का ? त्यामुळे या टोळीवर तुम्ही पांघरून घालताय ते घालायला नाही पाहिजे असाही सल्ला त्यांनी यावेळी मुंडे यांचं नाव न घेता दिला आहे.