महाकुंभ मेळ्यात अचानक चर्चेत आलेल्या आयआयटी बाबाला जुना आखाड्याने बाहेर काढलं आहे. आयआयटी मुंबईत शिकलेल्या आणि मोठ्या पगाराची नोकरी सोडून अध्यात्माकडे वळलेल्या अभय सिंहच्या अनेक मुलाखती व्हायरल झाल्या आहेत. यात त्याने आई-वडिलांमध्ये वाद व्हायचे आणि त्यामुळे आपली अशी अवस्था झाल्याचंही सांगितलं होतं. आता अभय सिंहने प्रेम आणि मोह यातला फरक सांगताना थेट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केलाय.
अभय सिंहने म्हटलं की, प्रेमाचा जन्म करुणेतून आणि मोहाचा जन्म अहंकारातून होतो. प्रेम म्हणतं की देव माझ्या मुलाला सगळं सुख देतोय आणि देईल. पण मोह म्हणतं मी माझ्या पुत्राला सगळं सुख देईन. आईबाप म्हणतात ना हे मी केलं ते अहंकारातून येतं. मी शिकवलं, मी हे केलं, मी ते केलं, हे अहंकारातून बोलतात, हा सगळा मोह आहे. हे प्रेम नाही. प्रेम असेल तर मी काही केलं नाही, देवाने केलं असं म्हणतील. प्रेम मुक्ती देतं तर मोह मागतं. प्रेम बोलतं, मला माझ्या मुलावर गर्व आहे. पण मोह माझ्या मुलाला माझ्यावर गर्व असावा असं म्हणतं.
आयआयटी बाबा अभय सिंह म्हणाला की, शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे हे मोहात अडकले. बाकी सगळं ठीक होतं. भीष्म पीतामह, द्रोणाचार्य हेसुद्धा मोहातच अडकले होते. आता त्यांचा पक्ष कोणत्याही विचारधारेशिवाय चालतोय. काहीच राहिलं नाही. आता त्यांचा मुलगा ज्यांच्यासोबत बसलाय त्यांनाच बाळासाहेबांचा विरोध होता. ज्यांच्या विरोधासाठी पक्ष स्थापन केला तेच सोबत आहेत.
बाळ ठाकरेंनी पक्ष बनवला असेल तेव्हा काहीतरी विचारधारा होती. पण जेव्हा पक्षाचा नेता निवडायचा होता तेव्हा विचारधारेशी फरक पडत नाही, तो माझा मुलगा असावा अशा भूमिकेतून निवड केली. मोहातून हे घडलं. प्रेम असतं तर त्यांनी नेता म्हणून पात्र असलेल्याकडे नेतृत्व दिलं असतं. विचारधारा पुढे नेणाऱ्याकडे दिलं असतं. शिवरायांच्या निती धोरणांना, विचारांना पुढे नेणाऱ्याला नेता केलं असतं.
आता जुना आखाड्याने आयआयटी बाबा नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहला बाहेर काढलं आहे. जुना आखाड्यात येण्यास मनाई केलीय. त्याच्यावर आरोप आहे की, गुरुंबद्दल अपशब्द काढले. आखाड्याच्या शिबिराच्या जवळपास येण्यावर बंदी घातलीय. या प्रकरणी जुना आखाड्याच्या संतांनी सांगितलं की, संन्याशी असलेल्याला शिस्त आणि गुरुबद्दल समर्पण महत्त्वाचं आहे. याचं पालन न करणारा संन्याशी बनू शकत नाही.
अभय सिंह मूळचा हरयाणाच्या झज्जर इथला आहे. त्याने अनेक इंटरव्यूमध्ये आपण आयआयटी मुंबईमध्ये शिकल्याचं सांगितलंय. एअरोस्पेस इंजिनिअरिंग झालेल्या अभय सिंहने कॅनडात काही काळ नोकरीसुद्धा केली. कोरोनाकाळात मायदेशी आल्यानंतर तो अध्यात्माच्या मार्गावर वळला.