Saif Ali Khan : हल्लेखोराचा गल्ली ते दिल्ली शोध..! छत्तीसगडमधून संशयित ताब्यात
esakal January 19, 2025 01:45 PM

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला तीन दिवस लोटले तरीही हल्लेखोरास अटक होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या मुंबई पोलिसांनी गल्ली ते दिल्ली अर्थात संपूर्ण देशात त्याचा शोध सुरू केला आहे. स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेची पथकेही शनिवारी विविध वस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्यक्ष फिरून आपण याला पाहिले का? असा प्रश्न विचारत होते.

दुसरीकडे आरोपीचा फोटो प्रत्येक राज्याच्या पोलिसांना विशेषतः रेल्वे पोलिसांना पाठवून सावध करण्यात आले आले त्यामुळेच शनिवारी मध्यप्रदेशच्या रेल्वे सुरक्षा बलातील अधिकाऱ्यांनी एका संशयितास भोपाळ स्थानकातून ताब्यात घेतले होते. मात्र ही व्यक्ती सैफवर हल्ला करणारी नाही असे मुंबई पोलिसांनी त्यांना कळविल्याचे समजते. दरम्यान सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर गुरुवारी दिवसभर वांद्रे, दादर परिसरात भटकत होता अशी माहिती पुढे येत आहे. तो त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दादर स्थानकाजवळील दुकानातून त्याने इयरफोन घेतले. तो पुन्हा स्थानकात आला मात्र त्यानंतर तो कुठे गेला? याचा पत्ता अद्याप लागलेला नाही.

वाद चव्हाट्यावर

सैफ हल्ल्याच्या निमित्ताने मुंबई पोलिस दलाच्या अन्वेषण क्षमता, खबऱ्यांचे जाळे आदींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आहे. या शिवाय या प्रकरणाने गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांमधील बेबनाव, स्पर्धा, वाद आदी मुद्देही चर्चिले जात आहेत. घटना घडल्यावर आम्हीच आरोपी पकडणार या स्पर्धेतून महत्त्वाचे तपशील गुन्हे शाखेला न देणे, विलंबाने देणे आदी विषय सैफ हल्ल्याच्या निमित्ताने चघळले जात आहेत.

करीनाच्या जबाबाने संभ्रम

वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी असलेल्या करीना कपूर - खानचा जबाब नोंदविला असून त्यात तिने घटनाक्रम कथन केला आहे. आरोपी प्रचंड आक्रमक होता असे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यावेळी घरात बऱ्याच मौल्यवान वस्तू होत्या मात्र हल्लेखोराने त्या चोरण्याचा प्रयत्न केला नाही, या तिच्या दाव्यामुळे आरोपी नक्की चोरीसाठी सैफच्या घरात शिरला होता का? की त्यामागे अन्य काही हेतू होता? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सैफवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीवरून छत्तीसगड पोलिसांनी शनिवारी दुपारी संशयित आरोपीस दुर्ग रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. आकाश कनोजिया असे या संशयिताचे नाव असून तो ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने प्रवास करत होता. आकाशला ताब्यात घेण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक रायपूरच्या दिशेने रवाना झाले. हेच पथक शनिवारी रात्री त्याला घेऊन मुंबईत दाखल होऊ शकते. मुंबई पोलिसांनी मात्र अद्याप आकाश हाच सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी आहे यावर शिक्कामोर्तब केलेले नाही.

मुंबई पोलिस दलाचे विशेष आयुक्त देवेन भारती यांनी छत्तीसगड पोलिसांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती संशयित आहे असे स्पष्ट केले. छत्तीसगड पोलिसांच्या दाव्यानुसार या संशयिताची माहिती, छायाचित्र आणि मोबाइलचे टॉवर लोकेशन आदी माहिती शनिवारी दुपारी १२.२४ च्या सुमारास जुहू पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली होती. ही माहिती मिळाली तेव्हा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस गोंदिया आणि राजनंदगाव स्थानकांदरम्यान होती.

त्यामुळे राजनांदगाव स्थानकावर पथक तैनात करण्यात आले मात्र तेथे संशयितास पकडणे शक्य झाले नाही. अखेर दुर्ग स्थानकात दोन पथकांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याचे छायाचित्र मुंबई पोलिसांना पाठविण्यात आले. मुंबई पोलिसांनी खात्री केल्यावर या व्यक्तीस दुर्गच्या आरपीएफ चौकीत नेण्यात आले. तेथून व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे बोलणे मुंबई पोलिसांशी करून देण्यात आले असा दावा छत्तीसगड पोलिसांकडून करण्यात आला आहे.

मिशांवरून संभ्रम

छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलेल्या आकाशचे छायाचित्र हे सैफवर हल्ला केल्यानंतर इमारतीतून खाली उतरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या आरोपीशी मिळतेजुळते आहे. दरम्यान मिशीवरून मात्र हाच तो आरोपी आहे का? असा संभ्रम निर्माण होत आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मिशी नव्हती. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या आकाशला मिशी आहे. शिवाय केशरचनाही भिन्न दिसते.

याबाबत मुंबई पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलेला आकाश मुंबईतील कुलाब्याचा रहिवासी आहे. तो मनोरुग्ण असून त्याच्याविरोधात चोरी, हत्येचा प्रयत्न आदी गुन्हे नोंद आहेत. शिवाय एका प्रकरणात त्याने पाच ते सहा वर्षांची शिक्षाही भोगली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.