सावर्डे बनलं शिक्षणाचं केंद्र
esakal January 19, 2025 01:45 PM

ऐंशीच्या दशकापर्यंत कोकणातील टिपिकल गावांप्रमाणेच सावर्डे एक होतं. बारा बलुतेदारीचा उत्तम नमुना येथे पाहायला मिळायचा. शेती हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन. घरातील कुणी मुंबईत कामाला असायचा त्याची थोडी चांगली स्थिती; मात्र एकमेकांच्या शेतात पिकवलेले धान्य, भाजीपाल्याची देवाणघेवाण करत कुटुंबाच्या गरजा भागवल्या जात होत्या.

सावर्डेपासून काही अंतरावर असलेल्या चिपळुणात कपड्यालत्त्यासह अन्य वस्तूंची खरेदी केली जायची. त्यासाठी गावातील दोन-चार बैलगाडीतून पुरुषमंडळी जात होती. शिक्षणाचा अभाव, घरात अठराविश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत सावर्डेतील अनेक कुटुंबे होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूने कौलारू किंवा मातीच्या भिंती असलेले गवताचे छप्पर असलेली घरे दिसत होती.

शैक्षणिक हब म्हणून सावर्डे गावाची ओळख निर्माण होईपर्यंतचा प्रवास याची देही याची डोळा पाहिलेल्या खेरशेत येथील मनोहर ऊर्फ अप्पा साठे यांनी सावर्डेच्या विकासाची यशोगाथा उलगडली. ते म्हणाले, माजी खासदार (कै.) गोविंदराव निकम यांनी १९५७ ला सह्याद्री शिक्षणसंस्थेची स्थापना केली. गावातील मुलांनी शिकावे, या एकाच उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला होता. यासाठी गावातील मोडक, मोहिते, चव्हाण, फुटक यांच्यासारख्या मंडळींचेही साह्य लाभले. शाळा सुरू करण्याचा निर्णय मोठा धाडसी होता; पण त्याचा फायदा आजूबाजूच्या गावातील मुलांनाही झाला.

गावातील तरुणांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी १९८३ ला औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, कारपेंटर, कोपा, शिवणकामसारखे विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारक्षम बनवण्यात त्यांना यश आले. त्याचा फायदा स्थानिक युवकांसह दुसऱ्या जिल्ह्यातील अनेक तरुणांना झाला.

रायगडपासूनचे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी सावर्डेत येऊ लागले. त्याहीपुढे जाऊन गोविंदराव निकम यांनी १९८४ ला डिप्लोमा इन फार्मसी कॉलेज आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विनाअनुदानित महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचा फायदा घेत खासगी डीएड, बीएड कॉलेज सुरू केले. त्यामधून शेकडो शिक्षक बाहेर पडू लागले. यामध्ये स्थानिकांपेक्षा नाशिक, धुळे, नंदुरबार अशा परजिल्ह्यातील लोकांचाच अधिक भरणा असायचा.

माध्यमिक शाळा, महाविद्यालय सुरू करतानाच त्यांनी स्कूल ऑफ आर्ट, औषधनिर्माण शास्त्र पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालय, ३५० एकरवरील कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, एमबीए, बीएमएस, बीएसस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, बीएसस्सी नर्सिंग अशी विविध प्रकारची उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची साखळी निर्माण केली. त्यामुळे आपसूकच सावर्डे शैक्षणिक हब म्हणून राज्यात ओळखले जाऊ लागले.

सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या शाळा, महाविद्यालयातून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यातील काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत तर काहींनी गावीतील रिकाम्या खोल्यांचा आधार घेतला. जेवण, नाश्त्यासाठीही ते महाविद्यालयातील मेसवर अवलंबून राहत नव्हते.

शैक्षणिक संस्थेत नोकरी करणारे कर्मचारीही बाहेरच्या जिल्ह्यातील होते. त्यांना राहण्यासाठी सावर्डेतील कुणाच्या ना कुणाच्या घराचा आधार घ्यावा लागत होता. ही त्यांची गरज स्थानिक लोकांनी आपल्या आर्थिक प्रगतीसाठी उपयोगात आणली. याबाबत सावर्डे येथील शकील मोडक म्हणाले, भाड्याने रूमची गरज वाढल्याने नवीन संकुलांची भर पडू लागली. जेवणासाठीच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक लोकांनी हॉटेल, खाणावळी सुरू केल्या.

सुरुवात दोन-चार टपऱ्या आणि किस्मत नावाचे एकमेव हॉटेल होते. आता तीच संख्या ४० वर पोचली आहे. यामधून दिवसाला दीड ते दोन लाखांची उलाढाल होत आहे. एकेकाळी जनरल स्टोअर्समधून औषधे विकत घ्यावी लागत होती; मात्र आता २७ मेडिकल दुकाने आहेत. कपड्यांची २५ हून अधिक दुकाने, सराफींच्या चार पेढ्या, दुचाकीची शोरूम, १५ हून अधिक गॅरेज, चार स्पेअर पार्टसची दुकाने, सर्व्हिसिंग सेंटर अशीही अनेक दुकाने सावर्डे बाजारपेठेत सुरू झाली आहेत.

आजूबाजूच्या ५० गावांतील लोकांसाठी सावर्डे बाजारपेठेचाच आधार आहे. सर्वसाधारण दर दिवशी ६० ते ७० लाखांची उलाढाल या बाजारपेठेत होत असते. दर रविवारी येथे आठवडा बाजार भरतो. तिथे एका दिवसात दहा लाखांहून अधिक उलाढाल होते तसेच तीन पेट्रोल पंप, राष्ट्रीयीकृत बँकेच्या तीन शाखा, दोन को-ऑप. बँक, सहा पतसंस्था आहेत. नोकरी, व्यवसायातून स्थानिक लोकांच्या उत्पन्नात भर पडू लागली. त्यामुळे आर्थिक स्तरही उंचावला जात आहे.

आज प्रत्येकाच्या दरवाजामध्ये एखादी दुचाकी, चारचाकी पाहायला मिळत आहेत. शाळांमध्ये मुलांना सोडण्यासाठी सुमारे दीडशेहून अधिक रिक्षा आहेत. त्यामधून रोजगारनिर्मितीही झाली आहे.

सावर्डे परिसरात मोठ्या प्रमाणात कात तयार करण्याचा उद्योग आहे. आजूबाजूच्या जंगलातील खैराच्या झाडांचा उपयोग कात तयार करण्यासाठी केला जात होता. गेल्या दोन दशकांत दहा छोटे-मोठे कात उद्योग आहेत. सुरुवातीला झाडाची सालं काढून ती तोडणे, त्यावर प्रक्रिया करणे या गोष्टींसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागत होते.

अवजड कामासाठी पुरुष तर अन्य छोट्या-छोट्या कामासाठी महिलांना नियुक्त केले जाऊ लागले. यामधून सुमारे ६०० हून अधिक लोकांना रोजगार मिळाला होता. घरामध्ये राहून शेतीसह कुटुंब सांभाळणाऱ्या महिलेच्या हातात दर महिन्याला पैसा येऊ लागला. त्यामधून कुटुंबाचे उत्पन्न वाढले.

बांधकाम व्यवसायाला सुगी

परजिल्ह्यातून नोकरीसाठी आलेले, दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांनी सावर्डेत वास्तव्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आठ हजार लोकसंख्येचे गाव ३० हजारांवर पोचले आहे. आंबतखोल, राजवाडी, निर्मलवाडी या धरणांमुळे सावर्डेचा पाणीप्रश्नही सुटला होता. त्यामुळे गावात राहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे आपसूकच कन्स्ट्रक्शन व्यवसायाला सुगीचे दिवस आले.

सध्या सावर्डेतच २५ हून अधिक कॉन्ट्रॅक्टर आहेत. महामार्ग, रेल्वे स्टेशन, शैक्षणिक संस्थांचे जाळं आणि डेरवण येथे उभारलेले वालावलकर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यामुळे येथील जमिनींची मागणी वाढली. १९६९ ला पाचशे रुपये गुंठा एवढा दर होता. तोच आता दहा लाख रुपये गुंठा झाला आहे.

याबाबत येथील कंत्राटदार रफिक चिलवान म्हणाले, दहा वर्षांपूर्वी सावर्डे परिसरात कौलारू किंवा स्लॅबची घरे बांधली जात होती; मात्र आपसूकच लोकांची संख्या वाढू लागल्यामुळे अपार्टमेंट संस्कृतीचा उदय झाला. नोकरीसाठी आलेल्या लोकांपैकी सुमारे ४० टक्के लोकं सावर्डेतच स्थायिक झाली होती. त्यांनी फ्लॅट किंवा जमिनी खरेदीवर भर दिला. त्यामुळे मागणी वाढली.

  • ३० हजार - लोकसंख्या

  • १९ - शाळा, महाविद्यालयांची संख्या

  • तीन किलोमीटर अंतरावर खासगी मेडिकल कॉलेज

  • मुलांची संख्या सुमारे - ८ हजार

  • ७० ते ८० लाख - बाजारपेठेतील उलाढाल दिवसाला

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.