लाडकी बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये कधी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विरोधकांनी तर योजनाच बंद पडणार असं भाकित केलं होतं. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात वाढीव हफ्ता कधी मिळणार याची तारीखच भाजप मंत्र्यांनी सांगितली आहे. कधीपर्यंत लाडक्या बहिणींना हे २१०० रुपये मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत...
निवडणुकीआधी विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर असा हल्लाबोल केला होता. ही योजना निवडणुकीनंतर बंद पडेल असाही आरोप होत होता. मात्र तसं काही झालं नाही. लाडक्या बहिणींमुळे सत्ता मिळालेल्या महायुती सरकारनं ही योजना सुरुच ठेवली आहे.
मात्र २१०० रुपयांचं दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. मात्र अर्थसंकल्पानंतर मार्चमध्ये २१०० रुपये मिळणार असल्याचा पुनरूच्चार असं जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय.
विधानसभा निवडणुकीपूर्वी २१०० रूपयांवरून विरोधकांनी महायुती सरकारची खिल्ली उडवली होती. सुमारे अडीच कोटी लाभार्थ्यांना २१०० रुपयांचं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात असलं तरी अद्याप तसा प्रस्ताव सरकारनं अजून तयार केला नाही.
या योजनेचा आर्थिक भार जास्त असल्यानं इतर विभागांच्या कामावर याचा परीणाम झालाय हे वास्तव आहे. असं असूनही लाडक्या बहिणींच्या कोपराला २१०० रूपयाचं गूळ वारंवार लावला जातोय.