दहावीनंतरचे नियोजन
esakal January 22, 2025 11:45 AM

- रिना भुतडा, करिअर समुपदेशक

दहावीनंतरचा टप्पा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो, कारण याच क्षणी करिअरची दिशा ठरते. शालान्त परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्याबरोबरच भविष्यासाठी योग्य करिअर नियोजन म्हणजे योग्य शाखा, प्रवेश प्रक्रिया तसेच महाविद्यालयाची निवड करणेही तितकेच आवश्यक आहे. विचारपूर्वक केलेले करिअर नियोजन केवळ शैक्षणिक यश मिळविण्यास मदत करत नाही, तर दीर्घकालीन यशस्वी वाटचालीसाठी योग्य दिशा देते.

विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी तयार आहेत का?

दहावीनंतर योग्य शाखा (कला, विज्ञान, वाणिज्य, पॉलिटेक्निक, डिप्लोमा इ.) निवडणे ही महत्त्वाची गोष्ट असते. ही निवड विचारपूर्वक करणे गरजेचे आहे. कारण ती त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि भविष्यातील करिअरसाठी मूलभूत भूमिका तसेच पात्रता बजावते. करिअरचे स्पष्ट मार्ग तयार करण्यासाठी महत्त्वाचे टप्पे पाहूयात.

अधिकाधिक माहिती मिळवा

वर्तमानपत्रातील किंवा करिअर पुस्तके, करिअरशी संबंधित लेखांचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. युट्युब, पॉडकास्ट, वेबसाइट या माध्यमातूनही उपयुक्त माहिती मिळू शकते.

पर्याय समजून घ्या

विविध शाखांचे अभ्यासक्रम (कला, विज्ञान आणि वाणिज्य) समजून घेऊन, त्यातील अभ्यासक्रम, विषयांची काठिण्य पातळी, टॉपिक्स, उपलब्ध प्रवेश प्रक्रिया, त्यातील स्पर्धा इ. सखोलमध्ये बघणे महत्त्वाचे असते.

मार्गदर्शन घ्या

पालक, शिक्षक आणि करिअर सल्लागारांशी चर्चा करू शकता, अनुभवी व्यक्तींशी किंवा माजी विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या अनुभवांमधून निर्णय घ्यायला मदत होऊ शकते. कलचाचणीचा कल जाणून घेण्यासाठी फायदा होऊ शकतो.

शैक्षणिक संस्थांना भेट

शाळा, महाविद्यालय, क्लासेस ना भेट देऊन उपलब्ध अभ्यासक्रम, प्राध्यापक, आणि सुविधा याबाबत माहिती मिळवणे फायदेशीर ठरेल.

२+२+२ नियम

२ विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घ्या, २ महाविद्यालयांना भेट द्या, आणि २ तज्ज्ञांशी चर्चा करा. यातून करिअरचे ‘योग्य शब्दांकन’ करण्यास मदत होईल.

गर्दीचे अनुसरण नको

तुम्हाला योग्य वाटते आणि तुमच्या कलानुसार, कौशल्याला साजेसे, कौटुंबिक पार्श्वभूमीला अनुसरून निर्णय घ्यावा.

स्पष्ट उद्दिष्टे ठेवा

तुमचे उद्दिष्ट नेमके काय आहे हे ठरवा. तुमच्या आवडीच्या शाखेबद्दल, निरनिराळ्या करिअरबद्दल, राज्य तसेच देश पातळीवरील प्रवेश प्रक्रिया, त्यांच्या काठिण्य पातळीबद्दल माहिती मिळवा.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

करिअर सल्लागार (समुपदेशक) आणि मार्गदर्शकांकडून क्षेत्रातील संधी, पर्याय, त्यातील स्पर्धा, प्रवेश प्रक्रिया, कटऑफ, लागणारा वेळ व खर्च या विषयी माहिती घेऊन चांगला गृहपाठ पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करावा.

  • मोठी स्वप्न बघा, परंतु ते तुमच्या आवाक्यात म्हणजे लागणारे श्रम, वेळ व खर्च याला अनुसरून आहे की नाही? तेही तपासून बघणे गरजेचे आहे.

  • जितक्या लवकर नियोजन सुरू कराल, तितक्या अधिक चांगल्या संधी आपल्याला मिळत जातील.

  • डॉक्टर, इंजिनिअर, सी ए, लॉयर अशा परंपरागत करिअर व्यतिरिक्तही वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल विचार करावा.

करिअर नियोजन महत्त्वाचे का?

आजच्या जलद बदलणाऱ्या नोकरीच्या क्षेत्रात योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या आवडी आणि उद्योगातील मागण्या यांचा विचार करून निर्णय घ्यावा.

दहावीनंतर योग्य करिअर नियोजन केल्याने केवळ शैक्षणिक यश मिळत नाही, तर यशस्वी आणि समाधानकारक करिअरची मजबूत ‘पायाभरणी’ होत असते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.