कसोटी क्रिकेटसाठी 2024 हे वर्षे खूपच महत्त्वाचं होतं. या वर्षात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचे दोन संघ ठरले. यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. पण इतर कसोटी संघांनीही चांगली कामगिरी केली. अवघ्या काही गुणांनी अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं. असं असताना मागच्या वर्षात सर्वोत्तम कागमिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची निवड आयसीसीने टेस्ट टीम ऑफ द ईयरमध्ये केली आहे. या संघाची घोषणा आयसीसीने शुक्रवारी केली. यात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान मिळालं. तर ऑस्ट्रेलियाचा फक्त एकच खेळाडू या संघात आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आहे. त्याच्याच खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. तर भारताकडून जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंची नावं आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका संघातील फक्त एकच खेळाडू आहे. या प्लेइंग इलेव्हनध्ये इंग्लंडचे 4, न्यूझीलंडचे 2, श्रीलंकेचा 1 खेळाडू आहे.
भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला ओपनिंगला संधी मिळाली आहे. तर दुसरा ओपनर म्हणून इंग्लंडचा बेन डकेट आहे. या दोन्ही खेळाडू मागच्या वर्षी जबरदस्त कामगिरी केली आहे. जयस्वालनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दोन द्विशतक ठोकले होते. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये शतकी खेळी केली होती. जयस्वालने 2024 मध्ये खेळलेल्या 29 डावात 54.74 च्या सरासरीने 1478 धावा केल्याय यात दोन शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. जो रूटनंतर सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघात रवींद्र जडेजाची निवड झाली आहे. त्याने मागच्या वर्षी 18 डावात 1 शतक आणि 3 अर्धशतकं ठोकत 527 धावा केल्या आहेत. तसेच 21 डावात 48 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने 26 डावात सर्वाधिक 71 विकेट घेतल्या. यात पाचवेळा पाच विकेट आणि चारवेळा चार विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.
आयसीसीची टेस्ट टीम ऑफ द ईयर : पॅट कमिन्स (कर्णदार), यशस्वी जयस्वाल, बेन डकेट, केन विलियमसन, जो रूट, हॅरी ब्रूक, कामिंदु मेंडिस, जेमी स्मिथ (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मॅट हेनरी आणि जसप्रीत बुमराह.