IND vs ENG 2nd T20i : टीम इंडिया आघाडी घेणार की इंग्लंड बरोबरी साधणार? कोण जिंकणार दुसरा सामना?
GH News January 24, 2025 09:10 PM

भारतीय क्रिकेट संघाने नववर्षात मायदेशात पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय आणि टी 20i सामन्यात विजय मिळवला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात युवा ब्रिगेडने पाहुण्या इंग्लंडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 133 धावांचं आव्हान हे 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आता टीम इंडिया आणि इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहे.उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी 25 जानेवारीला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाला रोखण्याचं आव्हान

टीम इंडिया मालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसमोर टीम इंडियाला रोखत मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमधून एका खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी 24 जानेवारीलाच 12 खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यानुसार गस एटकिन्सन याला प्लेइंग ईलेव्हनमधून डावलण्यात आलं आहे. संघात गस एटकिन्सन याऐवजी ब्रायडन कार्स याला संधी देण्यात आली आहे. तर विकेटकीपर जेमी स्मिथ याला 12 खेळाडू म्हणून समावेश संधी मिळाली आहे.

मोहम्मद शमीकडे सर्वांचं लक्ष

दरम्यान दुखापतीनंतर अनेक महिन्यांनी मोहम्मद शमी याचं भारतीय संघात कमबॅक झालं आहे. मात्र शमीला पहिल्या सामन्यात खेळवण्यात आलं नाही. मात्र शमी ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय ते पाहता तो दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसेल, असा विश्वास टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने विजयानंतर व्यक्त केला होता. त्यामुळे आता शमीच्या पुनरागमनाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जेमी स्मिथ (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.