Murder case : विडणी प्रकरणातील खुन्याची माहिती देणाऱ्यास लाखाचे बक्षीस; मृतदेहाची ओळख पटविण्यात अपयश
esakal January 26, 2025 03:45 PM

सांगवी/विडणी : विडणी (ता. फलटण) गावाच्या हद्दीत पंचवीस फाटा येथे उसाच्या शेतात सापडलेले मृतदेहाचे अवयव नेमके कोणत्या महिलेचे आहेत. हा खून आहे, की नरबळी याबाबत अद्यापही कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या घटनेची माहिती देणाऱ्यास पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी माहिती दिली.

दीप जाधव यांच्या शेतात सडलेल्या व अर्धवट अवस्थेमधील महिलेचे मृतदेहाचे अवयव १७ जानेवारीला आढळून आले होते. सडलेला वास आल्याने ही घटना उघडकीस आली. या मृतदेहाच्या परिसरात तेलकट साडी, बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सुरी अशा वस्तू आढळून आल्याने हा खून नसून नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत होता.

घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यामध्ये सुमारे १५ एकर उसाचे क्षेत्र मोकळे केल्यानंतर त्यांना मृतदेहाच्या परिसरात तेलकट साडी, स्कार्प, काळी बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सत्तूर अशा विविध वस्तू मिळून आल्या होत्या, तसेच सुमारे २०० मीटरवर असलेल्या पाण्याच्या पाठात एक डोक्याची कवटीही आढळून आली होती. त्यामुळे हा प्रकार नरबळीचा असल्याबाबत चर्चेला उधाण आले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच दिवशी पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी केली. या घटनेला आज आठवडा होऊन गेल्यानंतरही पोलिसांना या महिलेच्या उर्वरित मृतदेह, तसेच त्याचे अवशेषही मिळून आले नाहीत. त्याचबरोबर मृतदेहाची ओळखही अद्याप पटविता आली नाही.

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनेची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पोलिस यंत्रणेसमोर आव्हान

याप्रकरणी श्वान पथकाद्वारे तपास केल्यानंतर ही फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे संबंधित मृत महिलेची ओळख पटवणे व हा प्रकार खून, की अघोरी कृत्यातून घडलेला नरबळीचा आहे, याचा उलघडा करण्याचे जटिल आव्हान पोलिस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.