Akola News : सावधान..'जीबीएस'चा जिल्ह्यात शिरकाव; पाच रुग्णांवर उपचार सुरू , नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
esakal January 31, 2025 02:45 PM

अकोला : गुगुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराचे सर्वात आधी पुण्यात रुग्ण आढळले होते. या आजाराने पुण्यातील एका तरुणाचा बळी घेतल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

या आजाराने आता अकोल्यातही हातपाय पसरण्यास सुरवात केली असून सर्वोपचार रुग्णालयात जीबीएस बाधित पाच रुग्ण दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. दाखल रुग्णांवर वैद्यकीय पथकाच्याकडून उपचार सुरु आहेत.

जीबीएस हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून नसांवर हल्ला करते. यामुळे मज्जातंतूंच्या काही भागांना नुकसान पोहचते आणि स्नायू कमकुवत होतात, मुंग्या येणे, संतुलन गमावणे आणि त्यानंतर पक्षाघात येण्याची शक्यता असते. दरम्यान, हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नसल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची व घाबरण्याची गरज नाही. पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. आता अकोल्यात रुग्ण आढळून आल्याने यंत्रणा अलर्ट झाली आहे.

जीबीएसची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजारावर औषधोपचार करण्यासाठी आवश्यक औषध साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जीबीएससाठी आवश्यक असलेली औषधांच्या खरेदीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणेत समन्वयाचा अभाव

सर्वोपचार रुग्णालयात जीबीएस आजाराचे पाच रुग्ण दाखल होऊन त्यांच्यावर उपचार सुरु झाल्यानंतरही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांना याबाबात प्राथमिक माहिती देखील नव्हती. पाच रुग्ण पॉझिटिव्ह असताना ग्रामीण आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ असणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. ‘पाच रुग्ण दाखल आहेत, अशी कोणतीही माहिती आपल्याकडे नाही’, अशी प्रतिक्रिया डॉ.गाढवे यांनी दिली. यावरुन आरोग्य यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

महापालिका हद्दीत एक रुग्ण

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गत दोन दिवसांपासून शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. ८ ते १५ वयोगटातील बालकांचे सध्या आशा वर्करकडून सर्वेक्षण सुरु आहे. अद्याप जीपीएसची लक्षणे असलेला एकही संशयीत रुग्ण शिवणी परिसरात आढळून आला असल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष गिऱ्हे यांनी दिली.

जीएमसीकडे औषधांचा तुटवडा

जीबीएसवर उपचार करण्यासाठी इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शनचा वापर केला जातो. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयाकडे या इंजेक्शनचा तुटवडा आहे. इम्युनोग्लोबलीन इंजेक्शन जीबीएस रुग्णावर उपचार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र, जीएमसी प्रशासनाकडे आताच्या घडीला या इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याची माहिती आहे.

आजाराची सर्वसाधारण लक्षणे

  • अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा.

  • अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी.

  • डायरिया (जास्त दिवसांचा)

  • श्र्वास घेण्यास त्रास होणे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घ्या.

  • पाणी उकळून घेणे.

  • अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.

  • वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

  • उघड्यावरचे आणि जुने अन्न खाणे टाळा.

  • हात-पायांच्या स्नायूंमध्ये अचानक कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जीबीएस आजाराचे पाच रुग्ण उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहेत. या आजारात अशक्तपणा, थकवा आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळेवर आणि योग्य औषधोपचार घेतल्याने जीबीएसवर नियंत्रण मिळवता येते.

- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.