नवी दिल्ली : ‘‘दिल्लीकरांची अकरा वर्षे आम आदमी पक्षाने खराब केली आहेत. आता त्यांचे आमदार या पक्षाला रामराम करू लागले आहेत. मतदानाच्या आधीच ‘झाडू’च्या काड्या अस्ताव्यस्त होऊ लागल्या आहेत,’’ असा टोला हाणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली. रविवारी आर. के. पूरम येथे जाहीर सभा घेत मोदींनी भाजपच्या हाती दिल्लीची सत्ता देण्याची विनंती मतदारांना केली.
दिल्ली निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचारासाठी आज अखेरचा सुटीचा दिवस असल्याने सर्व पक्षांनी जोरदार प्रचार केला. या निवडणुकीत ‘आप’, काँग्रेस आणि भाजप असे तीन प्रमुख पक्ष मैदानात असले तरी खरी लढत भाजप आणि ‘आप’मध्येच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोदींनीही आजच्या सभेत याच पक्षाला लक्ष्य केले होते. मोदी म्हणाले,‘‘यावेळी चुकून देखील आप सरकार येऊ नये, याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. हे सरकार पुन्हा आले तर तुमची आणखी पाच वर्षे खराब होतील. निवडणूक हरणार असल्याची जाणीव झाल्यामुळे ‘आप’वाले खोट्या घोषणा देत आहेत. केजरीवाल यांच्या पक्षाच्या चेहऱ्यावरील बुरखा हटला आाहे. खोटेपणा सहन करणार नाही, असे महिला आणि रिक्षावाले खुलेआमपणे सांगत आहेत. दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर गरीब आणि मध्यमवर्गीय अशा सर्व घटकांसाठी आम्ही काम करू.’’
मोदी गॅरंटीएकीकडे ‘आप’त्ती वाल्यांच्या खोट्या घोषणा आहेत, तर दुसरीकडे ‘मोदीची गॅरंटी’ आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी सभेत केला. ‘‘मोदीची गॅरंटी म्हणजे काम होण्याची गॅरंटी आहे. मोदी जे बोलतो, ते करून दाखवतो. विकसित भारताच्या निर्मितीसाठी गरीब, युवावर्ग, शेतकरी आणि महिला हे चार स्तंभ मजबूत करण्याचे काम आपण केले आहे. अर्थसंकल्पात या वर्गांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारने गरिबांना मोफत धान्य, उपचार आणि घर देण्याची व्यवस्था केली आहे. रालोआ सरकारचे अर्थसंकल्प हे जनता जनार्दनाचे अर्थसंकल्प असतात. जनतेच्या आकांक्षेची पूर्ती त्याद्वारे झाली आहे. मागील दहा वर्षांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे. अर्थव्यवस्थेचा जगभरात दबदबा वाढला आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले.
‘हक्क हिरावण्याचा कट’दिल्लीतील झोपडपट्टीधारक आणि गरिबांची दिशाभूल करत त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज केला. भाजपकडून लोकांना तीन हजार रुपयांचे वाटप केले जात असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी आज व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत केला. ‘‘काही लोक गरिबांची दिशाभूल करत आहेत. घरून मतदानाची सोय झाली असल्याचे सांगून ते मतदारांच्या बोटाला शाई लावत आहेत. यासाठी त्यांना तीन हजार रुपयेही दिले जात आहेत. त्यामुळे या लोकांना मतदानाच्या दिवशी हक्क बजावता येणार नाही. माझ्याकडे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. हा जनतेविरोधात कट आहे,’’ असा आरोप केजरीवालांनी केला आहे.
तोफा आज थंडावणारदिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. ५) मतदान होणार आहे. उद्या (ता. ३) प्रचारासाठीचा अखेरचा दिवस आहे. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि इतर अनेक मंत्र्यांनी, भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत प्रचाराची राळ उडविली असून प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही जोरदार प्रचार होण्याचा अंदाज आहे. ‘आप’तर्फे अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांनीच प्रामुख्याने प्रचाराची धुरा सांभाळली असून सोमवारीही त्यांच्या अनेक ठिकाणी सभा होणार आहेत.