टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची टी 20i मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने रविवारी 2 फेब्रुवारीला मुंबईत झालेला पाचवा आणि अंतिम टी 20i सामना 150 धावांच्या फरकाने जिंकला. टीम इंडियाने अभिषेक शर्माच्या वादळी शतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 247 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडला 97 धावांवर गुंडाळून टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियासाठी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिश्नोई याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. तर इंग्लंडकडून फिलीप सॉल्ट या एकट्यानेच सन्मानजनक खेळी केली. सॉल्टने 23 बॉलमध्ये 55 रन्स केल्या. तर इतरांनी गुडघे टेकले आणि टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये जबरदस्त विजय मिळवला.
इंग्लंडने पुण्यात झालेल्या चौथ्या टी 20i सामन्यातील पराभवासह मालिका गमावली होती. त्यामुळे पाहुण्यांचा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता. मात्र इंग्लंडला त्यात काही यश आलं नाही. इंग्लंडच्या पराभवामुळे कर्णधार जोस बटलर निराश होता. बटलरने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये अभिषेक शर्माचं नाव घेतलं आणि बरंच काही म्हटलं.
“आम्ही या पराभवानंतर फार निराश आहोत. आम्ही काही गोष्टी चांगल्या केल्या. मात्र काही गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. टीम इंडिया जशी खेळली, त्याच प्रकारे आम्हाला खेळायचं आहे आणि त्यातही आणखी चांगल्या पद्धतीने करायचं आहे. इंडिया खासकरुन घरात चांगली टीम आहे. आम्हाला वानखेडेत येऊन चाहत्यांचा वेगळा अनुभव आला”, असं बटलरने म्हटलं.
“ब्रायडन कार्स आणि मार्क वूड या आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मी फार क्रिकेट पाहिलंय पण मला वाटतं की अभिषेकने खेळलेली खेळी सर्वोत्तम होती”, अशा शब्दात बटलरने अभिषेकच्या स्फोटक शतकांचं कौतुक केलं.
बटलरकडून अभिषेकच्या खेळीचं कौतुक
दरम्यान अभिषेकने 37 बॉलमध्ये 263.15 च्या स्ट्राईक रेटने 10 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने शतक झळकावलं. अभिषेक टीम इंडियासाठी रोहित शर्मा याच्यानंतर टी 20i मध्ये वेगवान शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.