मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनजंय मुंडे हे कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानियांनी (Anjali damania) धनंजय मुंडेंवर आरोप केले. मात्र, या पत्रकार परिषदेतून केवळ धनजंय मुंडेंना लक्ष्य करताना, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेफ करण्याचा प्रयत्न दमानिया यांच्याकडून केला जात असल्याचा प्रश्न शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, या पत्रकार परिषदेतील एक वाक्य जातीय रंग देणारे असल्याचेही अंधारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता सुषमा आंधारे (सुषमा अंडहरे) आणि अंजली दमानिया यांच्यातच वार-पलटवार होण्याची शक्यता दिसून येते.
अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दमानिया यांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ”अंजली दमानियांच्या लढ्याबद्दल कौतुकच. पण, पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न अंजली दमानिया का करत होत्या ते कळलं नाही..”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. तसेच, पत्रकार परिषदेतील एका वाक्यावर आक्षेप घेत ह्या वाक्यातून पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप अंधारे यांनी केलाय.
अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेतील एक वाक्य, ”एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि तोही कराडच ” हे वाक्य पत्रकार परिषदेला जातीय रंग देणारे आहे, याचे कृपया त्यांना भान असावे. वाल्मिक कराड किंवा या हत्या प्रकरणाशी संबंधित जो जो गुन्हेगार आहे, त्या प्रत्येकाला फाशीच व्हायला हवी. मात्र, कराड नावाची प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते हा चष्मा काढून टाका. कारण, मग या न्यायाने आपण वि.दा.कराड यांना सुद्धा गुन्हेगार ठरवायला मागेपुढे बघणार नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फोकस हलू नये यासाठी ही मांडणी महत्वाची आहे, असा सल्लाच सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांना दिला आहे. त्यामुळे, आता अंजली दमानिया काय उत्तर देतात हे पाहावे लागेल.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले. महाबीज, केव्हीके आणि एमएआयडीसीच्या योजनांचे पैसे डीबीटी मार्फत न देता उपकरणांच्या खरेदीसाठी टेंडर काढण्यात आले. या टेंडरमध्ये बाजारभावाच्या दुप्पट दराने वस्तुंची खरेदी करण्यात आली. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा करून डीबीटी घटकांच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्या. या सगळ्याच्या माध्यमातून किमान 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
अधिक पाहा..