नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी गेमचेंजर ठरली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतचे नियम टीव्हीवर येऊ द्यावेत. वर्तमान पत्रातून सांगावेत, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, लाडकी बहीण योजनेची मदत गरिबांना द्यायची होती. ज्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत, त्यांना पेट्रोल महिन्याला 10 हजार लागत असतील. हे दीड हजार घेऊन काय करायचं आहे. घरकाम, शेतकाम आणि इतर कामं करणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत वारंवार निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यासाठी छगन भुजबळ यांनी सरकारला एक सल्ला देखील दिला. चारचाकी वाहन ज्यांच्या नावावर असेल त्याबाबतची पडताळणी सुरु करण्यात येत आहे त्याबाबत विचारलं असता ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, तुमचे काय नियम असतील ते टीव्हीवर येऊद्यात, नियमात बसतील त्यांनी मदत घ्यावी, नियमात जे बसत नाहीत त्यांनी मदत सोडावी, वर्तमानपत्रात जाहिरात देता येईल. मात्र ते काही कुणी करत नाही, असंही भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ पुढं म्हणाले, चारचाकी वाहन असलेल्या बहिणींनी मदत घेतली असेल तर ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही. तो उपदव्याप करण्यात अर्थ नाही. माझं मत कार्यकर्ता म्हणून आहे, मी काही सरकारमध्ये मंत्री नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. नियमाची यादी आली तर गावातील लोकं सांगतील कोण नियमात बसत नाही, त्यामुळं सरकारला पण मदत होईल, असं छगन भुजबळ म्हणाले. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेऊ नये, असं म्हटलं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 7 हप्त्यांचे 10500 रुपये महिलांना मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात साधारणपणे 2 कोटी 40 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळाली आहे.
इतर बातम्या :
अधिक पाहा..