तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात या वर्षाच्या नव्या बेदाणा सौद्यास उत्साहाने सुरवात झाली. पहिल्याच सौद्यात ४९ टन नव्या बेदाण्याची आवक झाली, तर २५५ रुपये किलो इतका दर मिळाला. आमदार रोहित पाटील यांनी बेदाणा सौद्यास भेट दिली.
तासगाव बेदाणा बाजारपेठेत या वर्षी पंधरा दिवस विलंबाने नव्या बेदाण्याचे आगमन झाले. सतीश माळी यांच्या सतीश ट्रेडिंग कंपनी या दुकानात बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांच्या हस्ते नव्या बेदाण्याचे सौदे काढून नवीन बेदाणाचा उद्या प्रारंभ झाला.
आज बारा दुकानांमध्ये नव्या बेदाण्याचे आगमन झाले. त्यापैकी बबन कदम (आगळगाव) व विजयालक्ष्मी वादीकर (अंकलगी) यांच्या हिरव्या बेदाण्याला २५५ रुपये किलो असा विक्रमी दर मिळाला. रेवणसिद्ध कोहलगी (तिकोटा) यांच्या हिरव्या बेदाण्याला १३६ रुपये, हनुमंत सूर्यवंशी यांच्या हिरव्या बेदाण्याला २५१ रुपये तर कृष्णा पांढरे (रा. कागनरी ता. जत) यांच्या बेदाण्याला २५१ रुपये किलो असा दर मिळाला.
अडत दुकानांमध्ये आज मुहुर्ताचे सौदे काढण्यात आले. आज बाजारपेठेत ४२० टन बेदाण्याची आवक झाली, तर २५० टन बेदाण्याची विक्री झाली. मुहुर्ताच्या बेदाणा सौद्यासाठी बाजार समितीच्या संचालकांसह सचिव चंद्रकांत कणसे, बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजू कुंभार, विनीत बाफना, सुशील हडदरे, जगन्नाथ घनेरे, संजय बोथरा, सुभाष हिंगमिरे, राहुल बाफना, गगन अग्रवाल, राजू माळी, राम माळी यांच्यासह खरेदीदार, व्यापारी, सांगली, सोलापूर, कर्नाटक येथील बेदाणा उत्पादक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.