राज्यसभेत खासदाराने उपस्थित केला मुद्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालचे नाव बदलून बांग्ला करण्यात यावे, यात राज्याचा इतिहास आणि संस्कृतीची छाप असल्याचा दावा तृणमूल खासदार रीताव्रत बॅनर्जी यांनी राज्यसभेत शून्यप्रहरादरम्यान केला.
पश्चिम बंगाल विधानसभेने जुलै 2018 मध्ये सर्वसंमतीने राज्याचा नाव बदलण्याचा प्रस्ताव संमत केला होता, परंतु केंद्राने यावर सहमती व्यक्त केली नाही. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पश्चिम बंगालचे नवे नाव आमच्या राज्याचा इतिहास, संस्कृती आणि ओळखीनुरुप असेल असे सांगितले होते. आता कुठलाच पूर्व पाकिस्तान अस्तित्वात नाही. पश्चिम बंगालच्या लोकांच्या भावनांचा आदर केला जावा असे रीताव्रत बॅनर्जी यांनी म्हटले आहे.