Amit Deshmukh : सोयाबीन खरेदीला एक महिना मुदतवाढ द्या..! माजी मंत्री अमित देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
esakal February 08, 2025 08:45 PM

लातूर : सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरील खरेदीची मुदत संपल्यानंतर खुल्या बाजारात सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल एक हजारापर्यंत खाली गेल्यामुळे शेतकरीवर्ग प्रचंड अडचणीत आणि तणावाखाली आला आहे. या परिस्थितीत शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

यावर्षी राज्यात ५० ते ६० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले असून सोयाबीन हमीभाव केंद्रावर आतापर्यंत फक्त १० ते १२ लाख मेट्रिक टन सोयाबीनचीच खरेदी झाली आहे. शासनाने ठरवून दिलेला सोयाबीन खरेदीचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये असून आज हमीभाव खरेदी केंद्रावरील खरेदी थांबल्यानंतर खुल्या बाजारात ३ हजार ९०० रुपयांच्या खाली सोयाबीन विकले जात आहे.

शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने आपल्याकडील सोयाबीनची नोंदणी करण्यास सांगितले होते. प्रत्यक्षात उशिराने सुरू झालेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर अत्यंत धिम्या गतीने खरेदी सुरू राहिली.

सद्यःस्थितीत हमीभाव केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन पडून आहे. ज्या शेतकऱ्यांना एसएमएस गेलेला नाही त्या शेतकऱ्यांचा घरीही सोयाबीन शिल्लक आहे. नोंदणी झालेल्या ५० टक्के सोयाबीनची अद्याप खरेदी झालेली नाही. त्यामुळे किमान नोंदणी झालेले सोयाबीन तरी शासनाने एक महिन्याची मुदत वाढ देऊन खरेदी करणे आवश्यक आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत

मुदत संपल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र बंद होणार हे लक्षात आल्याने व्यापाऱ्यानी ता. एक जानेवारीपासूनच सोयाबीनचे भाव पाडण्यास सुरवात केली आहे. या परिस्थितीत सोयाबीनचे आगार असलेल्या लातूर बाजारपेठेत मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शासनाने ताबडतोब याची दखल घेणे गरजेचे बनले आहे. सरकारचे आयात धोरण आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्ग अगोदरच अडचणीत आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.