अभिजीत देशमुख, साम टीव्ही
कल्याणमध्ये रिक्षाचालकांची दादागिरी सुरुच असल्याची माहिती मिळत आहे. कल्याणमध्ये पुन्हा एकदा रिक्षाचालकांची दादागिरी समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवासी भाडे घेण्यावरून रिक्षाचालकाने टॅक्सीचालकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. रिक्षाचालकाच्या दादागिरीनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशन परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच रिक्षाचालकाने प्रवाशावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही, तोच एक रिक्षाचालकाने प्रवासी घेण्यावरून टॅक्सीचालकाशी हुज्जत घातली, इतकेच नव्हे. तर या वादातून रिक्षाचालकाने टॅक्सी चालकावर प्राणघातक हल्ला केला. सय्यद मैनुद्दीन असे जखमी टॅक्सी चालकाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या टॅक्सी स्टँडवर भिवंडी येथे राहणाऱ्या सय्यद मैनुद्दीन हा टॅक्सीचालक टॅक्सी रांगेत लावून उभा होता. आज दुपारच्या सुमारास एक प्रवासी टॅक्सी स्टँडवर आला. त्याने सय्यदला पुण्याला जाण्याचे किती भाडे होईल, असं विचारले. या टॅक्सी स्टँड जवळच रिक्षाचालक समीर पटेल हा देखील उभा होता. समीर पटेल याने तू भाडे का घेतोस, असा जाब सय्यदला विचारला. समीर याने सय्यदशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला.
संतापलेल्या समीरने सय्यदला मारहाण करत सय्यद याच्या डोक्यात शस्त्राने मारले. या मारहाणीत सय्यदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सय्यद याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला. तर दुसरीकडे या घटनेच्या निमित्ताने कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा एकदा मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी समोर आली आहे. रिक्षा चालकांच्या दादागिरीला पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी आता केली जातेय.
टॅक्सीचालक सय्यद मैनुद्दीन म्हणाला की, 'आम्ही बाजूला उभे होतो. एक पुण्याचं भाडे आले. हा प्रवासी आमच्यासोबत बोलत होता. त्यानंतर रिक्षाचालक मागून आला. प्रवासी व्यक्तीला पुण्याला घेऊन जाणार आहे का, असा टॅक्सीचालकाला प्रश्न केला. असा प्रश्न केल्यावर शिवीगाळ आणि मारहाण सुरु केली. शिवीगाळ का करतोय, असा प्रश्न केला. त्याचवेळी पंच काढून डोक्यावर मारला. डोक्याला आठ टाकले पडले आहे. चेहऱ्यालाही टाके पडले आहे. समीर पटेल असे रिक्षाचालकाचे नाव आहे.