Mega Block News : पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा जम्बो ब्लॉक, जाणून घ्या तिन्ही मार्गांवरचं मेगा ब्लॉकचं संपूर्ण वेळापत्रक
Saam TV February 09, 2025 02:45 AM

पश्चिम रेल्वेवर आज (८ फेब्रुवारी) रात्रीपासून १३ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी (९ फेब्रुवारी) मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्हीही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. रुळांची दुरुस्ती आणि अन्य तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड, पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड-मुंबई सेंट्रल आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे घेतला जाणार आहे.

पश्चिम रेल्वे :

कुठे - ग्रँट रोड-मुंबई सेंट्रल जलद मार्गावर

कधी - ८ फेब्रुवारी रात्री १०.३० ते ९ फेब्रुवारी सकाळी ११.३०

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री २६ लोकल गाड्या, तर रविवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १४२ अशा १६८ लोकल गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान लोकल धीम्या मार्गावरुन सुरु असतील.

मध्य रेल्वे :

कुठे - माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी - ९ फेब्रुवारी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांच्या दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. पुढे ठाण्यानंतर त्या लोकल जलद मार्गावरुन धावतील. तर ठाणेहून सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांच्या दरम्यान धीम्या मार्गावर चालतील.

हार्बर रेल्वे :

कुठे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी - ९ फेब्रुवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४०

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा येथून वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल आणि वांद्रे/ गोरेगावहून साठी सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द राहणार आहेत. तसेच पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी आणि गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटी सुटणारी हार्बर सेवा बंद राहणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.