Central Railway Block: मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक! गाड्या उशिराने धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
esakal February 09, 2025 02:45 AM

मुंबई: मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील अप रोडवरील पॉइंट क्रमांक १२६ ब आणि १२७ ए येथील ओव्हररायडिंग स्विच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी मंगळवारी (ता. ११) सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ या वेळेत विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही मेल - एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. काही गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसला रोहा स्थानकावर दुहेरी थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे.

रोहा कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येथून मार्गक्रमण करतात. त्यामुळे रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी नियोजित ब्लॉक घेणे गरजेचे असते. या वेळी ओव्हरराइडिंग स्विच बदलण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने काही गाड्या थोड्या विलंबाने धावतील. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे.

या गाड्या उशिराने धावणार

ट्रेन क्रमांक १६३४५ एलटीटी - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस (११ फेब्रुवारी सुटणारी)

ट्रेन क्रमांक १६३४६ एलटीटी - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस (१० फेब्रुवारी सुटणारी)

ट्रेन क्रमांक १२६१७ एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (१० फेब्रुवारी सुटणारी)

ट्रेन क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली - जामनगर एक्स्प्रेस (१० फेब्रुवारी सुटणारी)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.