मध्ययुगात वसाहतवादाची सुरुवात झाली तेव्हा पोर्तुगीज सर्वप्रथम भारताच्या किनाऱ्यावर आले.
त्यानंतर आलेल्या डच, इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी पण भारतात ठिकठिकाणी प्रदेश जिंकले. मात्र या देशांनी इथली आपली चंबुगबाळे एकापाठोपाठ उचलली.
सर्वात आधी आलेल्या पोर्तुगीजांनी सर्वात शेवटी म्हणजे साडेचारशे वर्षांनंतर १९६१ साली येथून आपला गाशा गुंडाळला.
भारतीय उपखंडाच्या अगदी चिमुकल्या का होईना आणि एकमेकांपासून काही शेकडे कोस दूर असलेल्या या चार प्रदेशांवर तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांनी आपली सत्ता गाजवली.
पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को दा गामा आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर. कालिकत येथे १४९८ ला पोहोचला.
त्यानंतर युरोपमधील अनेक राष्ट्रांतील साहसी दर्यावर्दी आणि व्यापारी कंपन्यांची गलबते भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यांवर लागली.
त्यापैकी प्रत्येक राष्ट्राने भारताच्या भूमीवर आपली सत्ता स्थापण्याचे प्रयत्न केले.
पोर्तुगीजांनंतर आलेल्या डच आणि फ्रेंच लोकांनी येथील काही प्रदेशांवर सत्ता गाजवली, ब्रिटिशांनी तर संपूर्ण उपखंडावर दिडशे वर्षे राज्य केले.
विशेष म्हणजे पोर्तुगालच्या राजकन्या कॅथरीन हिच्याशी लग्न करणाऱ्या इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला वरपित्याने आपल्या ताब्यात असलेल्या सात बेटांचे मुंबई या लग्नात चक्क आंदण - हुंडा - म्हणून १६६१ साली दिले होते. त्यावेळी मुंबई बेटाबरोबरच शेजारच्या वसईत पोर्तुगीजांची सत्ता होती.
ब्रिटिशांनी दिडशे वर्षे येथे राज्य केल्याचे परिणाम तर आपल्याला माहित आहे. पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले, त्याचे परिणामसुद्धा बऱ्यापैकी संबंधितांना आणि अभ्यासकांना माहित आहे.
मी स्वतः माझा उमेदीचा काळ - शिक्षण आणि पत्रकारितेतील सुरुवातीची नोकरी - गोव्यात घालवल्यामुळे मलाही पोर्तुगीज राजवटीचा गोव्यावर असलेला भलाबुरा प्रभाव माहित आहे.
माझ्या बारावीच्या परीक्षेचे प्रमाणपत्र गोवा, दमण आणि दीव शिक्षण मंडळाचे आहे !
गोव्याबरोबरच पोर्तुगीजांनी गोव्यापासून कितीतरी दूर असलेल्या गुजरातच्या दोन भिन्न टोकांवर किनाऱ्यापाशी असलेल्या दमण, दीव आणि दादरा नगर हवेली येथेसुद्धा तब्बल साडेचारशे वर्षे राज्य केले.
स्वतंत्र गोवा राज्याची १९८६ साली स्थापना झाल्यावर दीव आणि दमण केंद्रशासित प्रदेश बनला. अलिकडेच त्यामध्ये दादरा आणि नगर हवेलीचा या केंद्रशासित प्रदेशात समावेश करण्यात आला.
गोवा, दमण आणि दीव भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर १९ डिसेंबर १९६१ ला भारतीय संघराज्यात सामिल झाला.
त्याआधीच - चारपाच वर्ष आधी - पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दादरा आणि नगर हवेली कुठलाही गाजावाजा न होता भारतात सामिल झाले होते.
पत्रकारिता करताना पुण्यात मी रुजू झाल्यानंतर गोव्यातले माझे वास्तव्य संपले. संपर्क, नातेसंबंध आणि ऋणानुबंध अर्थात आजही कायम आहेत.
अलीकडच्या काळात पोर्तुगीजांची जुनी वसाहत असलेल्या दमण, दादरा आणि नगर हवेली येथे माझे काही काळ वास्तव्य असते.
समुद्रकिनारीच असलेले दीव येथून खूप दूर आहे, तिकडे जाण्याचे मला काही कारण आणि प्रायोजनसुद्धा नाही.
एकेकाळी गोव्याप्रमाणेच पोर्तुगीजांच्या Estado de India चा एक भाग असलेला हा चिमुकला दमण, दादरा आणि नगर हवेली प्रदेश मला खूप अचंबित करतो.
गोव्यात पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात. एक पोर्तुगीज भाषा सोडून.
गोव्यातील माझ्या शालेय जीवनात माझे शिक्षक, सहाध्यायी मुलेमुली आणि बुजुर्ग लोक पोर्तुगीज बोलत.
मी काम करत असलेल्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचे मालक वसंतराव आणि वैंकुठराव डेम्पो (धेम्पे) यांचे पोर्तुगीज भाषेवर चांगले प्रभुत्व होते.
आता गोव्यात पोर्तुगीज बोलणारे कुणीही आढळणार नाही. गोवा मुक्तीनंतर तेथे पोर्तुगीज भाषेचे पूर्ण उच्चाटन करण्यात आले.
शालेय अभ्यासक्रमातील दोन आणि तीन भाषिक धोरणात पोर्तुगीज भाषेचा बळी गेला. असे व्हायला नको होते असे मला आता वाटते.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची मुख्य भाषा गुजराती आहे.
पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाल्यावर गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६७ च्या जानेवारीत सार्वमत घेण्यात आले. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत झालेले भारतातले हे पहिले आणि अखेरचे सार्वमत.
या सार्वमतामध्ये मतदारांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता. गोव्यातल्या लोकांसाठी : तुम्हाला गोवा स्वतंत्र हवा की गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण हवे आहे. त्याचप्रमाणे दमण आणि दीव इथल्या लोकांसाठी पर्यायी प्रश्न होता. हे दोन तालुके स्वतंत्र हवे की गुजरात मध्ये त्यांचे विलीनीकरण हवे.
या सार्वंमताचा निकाल अगदी निसटता होता. अगदी थोड्याशा मतांच्या टक्केवारीच्या फरकाने गोवा, दमण आणि दीवचे त्या वेळी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये विलीनीकरण टळले. नाहीतर गोवा आज महाराष्ट्रात असता आणि दमण आणि दीव गुजरातमध्ये.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली इथे गुजराती मुख्य भाषा असली तरी दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मराठीभाषिक लोकांचे प्रमाण इथे मोठे आहे. याचे कारण महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्याला लागूनच दमण आणि दादरा नगर हवेली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.
गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत (२०२१ला ) दमण आणि दादरा नगर हवेली इथे चक्क (अविभक्त )शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर निवडून आल्या होत्या. अर्थात २०२४ साली त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.
दमण येथील भव्य किल्ला, गोव्याप्रमाणेच जुने बंगले आणि चर्च यांच्या रुपात पोर्तुगीज वारसा येथे आजही शाबूत आहे.
विशेष म्हणजे दमण, दादरा आणि नगर हवेली येथे कॅथोलीक कुटुंबात आजही पोर्तुगीज बोलली जाते!
गोव्याप्रमाणेच दमण, दादरा आणि नगर हवेली येथील कॅथोलिक युवकांनी मोठ्या प्रमाणात पोर्तुगालला आणि युरोपला स्थलांतर केले आहे.
दमण, दीव दादरा आणि नगर हवेली प्रदेश अनेक बाजूंनी कायमस्वरुपी ड्राय डे गुजरातच्या विळख्यात असला तरी गोव्यासारखी इथेसुद्धा मद्य खूप स्वस्त असते.
पोर्तुगालची साडेचार शतके वसाहत राहिलेल्या मात्र सर्वार्थाने दुर्लक्षित राहिलेल्या या प्रदेशाविषयी लिहिण्यासारखे खूप आहे..