मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज (10 फेब्रुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. एकिकडे नुकताच झालेल्या मनसेच्या राज्यस्तरिया कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर दुसरीकडे आज देवेंद्र फडणवीस यांनीच थेट राज ठाकरेंची घरी जाऊन भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Devendra Fadnavis And Raj Thackeray Meet)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा सुरू होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वक्तव्य करत ही भेट राजकीय नसून कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर भाष्य करत ही मैत्रिपूर्ण भेट असल्याचं सांगितलं.
हेही वाचा – Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीसांची तासभर बंद दाराआड चर्चा, पुन्हा होणार युती?
चर्चा ही केवळ तुमचीच असते. मी आणि राज ठाकरे भेटलो. ही कोणतीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंत राज ठाकरे यांचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यावेळी मी त्यांनी घरी येईन, असं सांगितलं होतं. त्यानुसार मी आज घरी गेलो होतो. नाष्टा राज ठाकरेंच्या घरी केला. गप्पा मारल्या. त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी निघालो. या बैठकीचा किंवा आमच्या गप्पांचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ माझी आणि त्यांची मैत्री आहे. त्या मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या शिवतीर्थावरील भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे आमदार होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यानुसार, शिवतीर्थावरील ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीदरम्यान, अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर घेण्याची चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे माहिम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले मनसेचे उमेदवार अमित ठाकरे हे भविष्यात विधान परिषदेचे आमदार होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : पार्कातील कॅफेत लोक चहापानाला येत असतात, ठाकरे-फडणवीस भेटीवर राऊतांचा टोला