टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज 12 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करणयात आलं आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाने रविवारी 9 फेब्रुवारीला कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये दुसरा सामना जिंकत मालिकेवर नाव कोरलं. आता टीम इंडियाकडे सलग तिसरा सामना जिंकत इंग्लंडला क्लिन स्वीप करण्याची संधी आहे.
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडचा 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 4-1 अशा फरकाने धुव्वा उडवला. तर आता इंग्लंडवर सलग 2 पराभवांमुळे क्लिन स्वीपची टांगती तलवार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आधी दोन्ही संघांचा हा शेवटचा एकदिवसीय सामना आहे. त्यामुळे हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. टीम इंडियाचा या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडला नेस्तनाबूत करण्याचा मानस असणार आहे. तर इंग्लंडचा या दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता टीम इंडिया विजयी हॅटट्रिक करण्यात यश मिळवते की इंग्लंड तसं करण्यापासून रोखते? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान टीम इंडियाने मालिका जिंकली असल्याने या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. टीम इंडिया 3 बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. केएल राहुल याच्या जागी ऋषभ पंत याचा समावेश केला जाऊ शकतो. रवींद्र जडेजा याच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तर मोहम्मद शमीऐवजी अर्शदीप सिंह याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळवलं जाऊ शकतं.
इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, गुस ऍटकिन्सन, मार्क वुड, जेमी ओव्हरटन आणि जेमी स्मिथ.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह.