आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी खेळाडूंमध्ये भलतीच चढाओढ पाहायला मिळत आहे. स्पर्धेतून एक खेळाडू बाहेर झाला नाही, तोवर दुसरा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होत असल्याचं सत्र जोरात सुरु झालं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, टीम इंडियानंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. अफगाणिस्तानचा 18 वर्षीय युवा ऑफ स्पिनर अल्लाह गजनफर हा दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीमकडून सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
गोलंदाजांमागे दुखापतीचं ग्रहणच लागलंय. गेल्या काही तासांमध्ये 3 संघांच्या 3 खेळाडूंना या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. टीम इंडियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकावं लागलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा धारदार बॉलर मिचेल स्टार्क याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतलीय. तर त्यानंतर गजनफर याला दुखापतीमुळे खेळता येणार नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, अल्लाहला फ्रॅक्चर झालंय. अल्लाह याला दुखापतीमुळे तब्बल 4 महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. या दरम्यानच्या काळात अल्लाहवर उपचार केले जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या झिंबाब्वे दौऱ्यात दुखापत झाली होती. अफगाणिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे संघात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र गजनफरच्या दुखापीतमुळे संघाला झटका लागला आहे.
अल्लाह याला झालेली दुखापत दुसर्या खेळाडूच्या पथ्यावर पडली आहे. नांग्याल खरोटी याला अल्लाहच्या जागी संघात स्थान देण्यात आलं आहे. नांग्याल याचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राखीव संघात समावेश करण्यात आला होता. मात्र अल्लाहच्या दुखापतीमुळे आता त्याला 15 सदस्यीय मुख्य संघात संधी मिळाली आहे.
दरम्यान अल्लाहला 4 महिने खेळता येणार नसल्याने हा मुंबई इंडियन्सलाही मोठा झटका आहे. मुंबईने आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी अल्लाहला 4.8 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र अल्लाहला दुखापतीमुळे आयपीएलमध्येही खेळता येणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अफगानिस्तान टीम: हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), इब्राहिम जादरान, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, नांग्याल खरोटी , नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक आणि नावेद जादरान .
राखीव खेळाडू : दरविश रसूली आणि बिलाल सामी.