अमली पदार्थांचा विळखा चार हजार कोटींचा
esakal February 12, 2025 11:45 AM

पुणे, ता. ११ : ससून रुग्णालय परिसरातून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त केल्यानंतर सुरू झालेल्या अमली पदार्थ प्रकरणाची व्याप्ती चार हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. विविध कारवायांमध्ये पुणे पोलिसांनी जप्त केलेले तीन हजार ६७२ कोटींचे एक हजार ८३६ किलो मेफेड्रॉन आणि दिल्ली येथून आरोपी संदीप यादवने परदेशात पाठविलेले ४३६ कोटींचे २१८ किलो, असे एकूण चार हजार १०८ कोटी रुपयांचे मेफेड्रोन असल्याचे या प्रकरणात पुढे आले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे (एनसीबी) या प्रकरणाचा तपास केल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींवर नुकतेच येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. कुरकुंभ येथील अर्थकेम लॅबोरेटरीजमधून ताब्यात घेतलेल्या एक हजार ८३६ किलो वजनाच्या मेफेड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तीन हजार ६७४ कोटी रुपयांहून अधिक आहे. कुरकुंभ येथे तयार झालेले हे मेफेड्रोन परदेशातही पाठविले गेले असल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. हे प्रकरण नंतर ‘एनसीबी’कडे वर्ग करण्यात आले आहे. गुन्हे शाखेने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून मेफेड्रॉन विक्रेता वैभव माने व त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात विश्रांतवाडी येथील हैदर शेख याची माहिती पुढे आली. हैदरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडूनही १०५ कोटी रुपये किमतीचे ५२ किलो ५२० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर कुरकुंभ येथील अर्थकेम लॅबोरेटरीजपर्यंत छापा टाकण्यात आला होता. या कारखान्यात तर तब्बल एक हजार ३२७ कोटी ६० लाखांचे ६६३ किलो ८०० ग्रॅम वजनाचे अमलीपदार्थ पोलिसांच्या हाती लागले होते.

यांच्या विरोधात दोषारोपपत्र
वैभव ऊर्फ पिंट्या माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख, भीमाजी परशुराम साबळे, युवराज बब्रुवान भुजबळ, आयुब अकबरशहा मकानदार, संदीपकुमार राजपाल बसोया, दिवेष चरणजित भूतानी, संदीप हनुमानसिंग यादव, देवेंद्र रामफुल यादव, सुनीलचंद्र बिरेंद्र बर्मन, महम्मद ऊर्फ पप्पू कुतुब कुरेशी, शोएब सईद शेख, सिनथिया ऊर्फ फेवॉर उगबाबं, अंकिता नारायणचंद्र दास, निशांत शशिकांत मोदी अशा १६ जणांना कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

कुरिअरने मेफेड्रॉन लंडनला
गुन्ह्याची व्याप्ती पुणे, मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटकासह विदेशात पोचल्यानंतर दिल्ली येथून संदीप यादव याने कुरिअरद्वारे लंडनला तब्बल २१८ किलो ड्रग पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्या अनुषंगानेही ‘सीबीआय’कडून तपास करण्यात आला आहे. ‘एनसीबी’ला लंडन येथील ड्रग पोचविलेल्या ठिकाणाचा पत्ताही सापडला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.