- डॉ. दिलीप फडके, editor@esakal.com
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कुमार केतकर यांनी ‘यांत्रिकाच्या सावल्या’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे, ‘हे पुस्तक म्हणजे एक त्रिमितीय - थ्री डी कौटुंबिक चित्र आहे, त्यात इतिहास आहे, राजकारण आहे, कौटुंबिक स्नेहसंबंध आहेत तसंच स्वातंत्र्य चळवळीचा, उद्योजकतेचा संदर्भ आहे. एक परस्पेक्टिव्ह, परिप्रेक्ष्य आहे.’
‘यांत्रिकाच्या सावल्या’ हे केवळ जांभेकर परिवाराचे कुटुंबचरित्र नसून ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि औद्योगिक इतिहासावरचे प्रभावी भाष्य आहे. हे एका व्यक्तीचे चरित्र नसून हा जांभेकर परिवारातल्या चार असामान्य व्यक्तींच्या असामान्य कारकीर्दीचा आणि विचारांचा आढावा आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत सुरू झालेला हा प्रवास भारतातील तेव्हाच्या सामाजिक आणि औद्योगिक परिस्थितीवर टिपणी करत पुढे जातो. प्रस्तावना आणि लेखिकेच्या मनोगतापासूनच महत्त्वाची माहिती कळायला सुरुवात होते.
किर्लोस्कर उद्योग समूहामुळे किर्लोस्कर हे नाव जितके सर्वश्रुत झाले, तितके जांभेकर हे नाव लोकांना परिचित नाही, परंतु किर्लोस्कर हे नाव प्रसिद्ध होण्यात त्या समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्करांबरोबर त्यांच्या ज्येष्ठ बहिणीचा मुलगा शंभोराव यांचेही प्रचंड योगदान आहे.
या पुस्तकातील मुख्य चरित्रनायक शंभोरावच असले, तरी त्यांच्या पत्नी गंगाबाई त्यांचा मुलगा रामकृष्ण आणि सून सुहासिनी चट्टोपाध्याय यांच्या कार्यकर्तृत्वावरही या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. हे चौघं अनसंग हीरो असून त्यांची योग्य ती दखल नव्याने औद्योगिक इतिहास लिहून घ्यायला हवी, यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.
मुंबईतील व्हीजेटीआय महाविद्यालयातून शंभोरावांनी इंजीनिअरिंगची पदवी घेतली होती. सांगली जिल्ह्यातील कुंडल गावाजवळ जेव्हा लक्ष्मणरावांनी कारखाना सुरू केला, तेव्हा शंभोराव त्यांच्याबरोबर होते आणि किर्लोस्कर समूहाच्या सुरुवातीच्या भरभराटीत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
प्लेगच्या साथीमुळे प्रथम मुंबई आणि नंतर बेळगाव सोडायला लागलेले लक्ष्मणराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हा कारखाना उभा केला होता. त्याचा तपशील वाचताना त्या काळच्या माणसांची जिद्द आणि चिकाटी यावर मनात विचार आल्यावाचून राहत नाहीत. शंभोरावांच्या जीवनात अनेक आव्हाने आली आणि त्यांनी त्या सगळ्यांवर मात केली.
काम करताना सामाजिक दायित्वाची जाणीव त्यांनी कधीच सोडली नाही हे विशेष वाटते. त्यांचा पहिला विमानप्रवास, परदेश दौरा, सैनिकी प्रशिक्षण, म्हैसूरजवळ सुरू केलेला कारखान्याची त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती, युद्धकाळात त्यांनी बनवलेली मशिनरी याची खूप छान माहिती या पुस्तकातून मिळते.
गंगाबाईंचे जीवन, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी केलेले सामाजिक योगदानही अतिशय महत्त्वाचे आहे. स्त्रियांना मदत म्हणून करत असलेले सुईणीचे काम त्यांनी अतिशय कुशलतेने केले. पुढे या कामासाठी आवश्यक नर्सिंगचे प्रशिक्षणही मुंबईतील कामा हॉस्पिटलमध्ये घेतले आणि ‘राधाबाई सूतिकागृह’ अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळले.
कोणत्याही अद्ययावत सुविधा नसताना त्यांनी केलेल्या जवळजवळ साडेतीन हजार प्रसूतींमधील एकाही मातेचा वा अर्भकाचा मृत्यू झाला नाही ही अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे. त्याचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. रामकृष्ण जांभेकर हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना स्वातंत्र्याच्या चळवळीने आणि साम्यवादी विचारसरणीने प्रेरित झाले आणि त्यांनी शिक्षण सोडले.
प्रथम ते गांधीजींच्या साबरमती आश्रमात गेले. नंतर १९२९ मध्ये त्यांनी अधिकृतपणे भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. ब्रिटिश राजवटीत त्यांनी आठ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. एका संपासाठी झालेल्या वाटाघाटीत कामगार प्रतिनिधी म्हणून रामकृष्ण जांभेकर आणि मालकांतर्फे शंभोराव होते. त्यानंतर शंभोरावांनी वाटाघाटी दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरल्याचे पत्राद्वारे सांगितले. ही माहिती त्या काळातल्या औद्योगिक स्थितीची ओळख करून देतेच पण त्या दोन व्यक्तींच्या तत्त्वनिष्ठेवरही भाष्य करते.
सध्याच्या काळात असे काही फक्त एखाद्या चित्रपटात होऊ शकते. सुहासिनी जांभेकर या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य होणाऱ्या प्रथम महिला होत्या. त्या आणि रामकृष्ण कामगार चळवळीत सक्रिय राहिले. ते दोघे रशियात एकदा मे दिनाच्या समारंभात उपस्थित होते आणि त्यांनी काही काळ हंगेरीतही वास्तव्य केले होते.
ह्या पुस्तकातील अनेक छोट्या छोट्या गोष्टी कधी आश्चर्य वाटायला लावतात तर कधी विचार करायला भाग पाडतात. बंगालमधील लहान मुली विकण्याची प्रथा, फ्रेंड्स ऑफ सोविएत युनियन ही संस्था आणि त्याचे भारतातील अस्तित्व, आयटकचे प्रतिनिधी म्हणून बीजिंगला गेले असताना रामकृष्ण जांभेकर यांच्या माओ आणि चौ एन लाय बरोबर झालेल्या भेटी, शंतनुराव किर्लोस्करांच्या लग्नात रामकृष्ण जांभेकरांनी संपादक म्हणून काढलेली अंतरपाट विवाह पत्रिका, पंडित नेहरूंनी किर्लोस्करवाडीला दिलेली भेट अशा गोष्टींमध्ये वाचक गुंतून पडतो.
चौघा चरित्रनायकांची माहिती आणि छायाचित्रे इंटरनेटवरही उपलब्ध नसताना लेखिकेने संशोधन, वाचन आणि मनन करून त्यांची अनुभवातून सांगड घालत हे सुंदर पुस्तक लिहिलं आहे. लेखिका प्रज्ञा जांभेकर या शंभोरावांच्या थोरल्या बंधूंच्या चौथ्या पिढीतल्या आहेत. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि मेहनत घेऊन पुस्तकासाठी माहिती गोळा केल्याचे जाणवते.
पुस्तकात केवळ लिखित माहिती नसून अनेक दुर्मीळ छायाचित्रे, दैनिक सकाळच्या १९५३ मधल्या दिवाळी अंकातला शंभोरावांनी लिहिलेला उद्योजकतेचा लेख जो आजच्या काळातही समर्पक आहे, त्याचा समावेश आहे. रामकृष्ण जांभेकरांची सुंदर अक्षरातील भावपत्रे, अशा अनेक रोचक गोष्टीही पुस्तकात आहे. आकर्षक मांडणी आणि सजावट, नावाला आणि मजकुराला साजेसं मृखपृष्ठ याने पुस्तकाचे देखणेपण वाढवलेलं आहे. आवर्जून वाचावे असे पुस्तक!
पुस्तकाचे नाव : यांत्रिकाच्या सावल्या
लेखक : प्रज्ञा जांभेकर
प्रकाशक : सदामंगल पब्लिकेशन, मुंबई
संपर्क : ९९६७०६३३३१ / ९९३०३६०४३१
पृष्ठं : ११४
मूल्य : २५० रुपये