पुणे : सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. कोकणातील रत्नागिरी येथे सलग दुसऱ्या दिवशी देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. शनिवारी (ता. २२) सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरीत ३८.४ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. २४) कोकणात उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.
कमाल तापमानात वाढ होत असून, राज्यात सर्वदूर उन्हाचा चटका वाढला आहे. रविवारी कोकणातील रत्नागिरीसह सांताक्रूझ, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जेऊर, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील अकोला, चंद्रपूर, यवतमाळ येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
दुपारच्या वेळी उन्हाचा झळा वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून, राज्यातही पहाटे काहीसा थंडावा जाणवत आहे. रविवारी (ता. २३) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची ठिकाणेरत्नागिरी ३८.४
सोलापूर ३८
सांताक्रूझ ३७.२
अकोला ३६.६
जेऊर ३६.५
चंद्रपूर ३६.४
यवतमाळ ३६.४
परभणी ३६