कऱ्हाड : पालिका नागरिकांना पुरवत असलेल्या अद्ययावत सुविधांचे साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. शहरातील २४ तास पाणी योजनेच्या मीटरवर या चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. शहरातील तब्बल १२ मीटरची चोरी झाली आहे. चोरलेली मीटर कवडीमोलाने विकली जात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चोरीची नोंद पालिकेत होऊन त्याबाबतच्या तक्रारी पोलिसांतही दिल्या जात आहेत. घराबाहेर लावलेले मीटर वायरपासून कापून त्या रातोरात लंपास होत आहे.
शहरात ९० टक्के कनेक्शनला मीटरशहरासह हद्दवाढ भागात १३ हजारांहून अधिक पाणी कनेक्शन आहेत. त्यापैकी सुमारे ९० टक्के पाणी कनेक्शनला मीटर बसवले आहेत. पुढे मीटरप्रमाणे पाण्यावरून राजकीय वाद झाल्याने त्याची कार्यवाही सध्या वादात अडकली आहे. त्यामुळे मीटरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला नाही. पालिकेने बसविलेली मीटर मॅन्युअल आहेत. त्याची खरेदी पालिकेने मुंबईतून केली आहे. मीटर बसविण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले होते. त्याचा फिडबॅकही पालिकेने घेतला आहे. मीटर बसविल्यानंतर त्याला जोरदार विरोध झाल्याने पुढचे नियोजन बारगळले.
दोन वर्षांपासून पडूनचपालिकेने सुमारे दोन वर्षांपूर्वी मीटर बसविण्याचे कंत्राट खासगी कंपनीला दिले होते. त्यानुसार पालिकेने पहिल्यांदा पाणी कनेक्शनचा सर्व्हे केला. त्यानुसार शहरासह हद्दवाढ भागात १३ हजार कनेक्शन असल्याचे समोर आले. त्यांना मीटर बसविण्याचे आदेश तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले होते. त्यानुसार ९० टक्के कनेक्शन त्या मीटरने जोडण्यातही आली. मात्र, पुढे काहीच न झाल्याने दोन वर्षांपासून प्रत्येक घराबाहेरील मीटर पडून असल्याने त्याकडे चोरट्यांची वक्रदृष्टी गेल्याचे दिसते.
अन्य साहित्यही लंपासनवीन बल्ब, विजेचे साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवार, मंगळवार पेठेसह कार्वे नाका परिसरातील पालिकेने पुरवलेल्या विविध सुविधांचे साहित्य चोरीस गेले आहे. चोरीवर पर्यायच नसल्याने पालिका हतबल आहे. पालिकेने बसवलेल्या साहित्यावर भुरटे चोर बिनधास्त डल्ला मारत आहेत. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नवीन ठिकाणी साहित्य देताना त्याच्या सुरक्षेचा विचार पालिका स्तरावर सुरू आहे. ज्या भागात वस्ती कमी आहे. रात्री लोक फिरकत नाही, अशी ठिकाणे चोरट्यांनी लक्ष केली आहेत. त्यामुळे नागरिकांना सुविधा पुरवताना भुरट्यांची डोकेदुखी रोखायची कशी? हा विषय महत्त्वाचा ठरतो आहे.