मनोज जयस्वाल
वाशीम : थकीत कराची वसुलीसाठी महापालिका, नगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. यासाठी विशेष वसुली पथक देखील नेमण्यात आले आहेत. मात्र वाशीम नगरपालिकेने थकीत कराची वसुली करण्यासाठी सर्वच कर्मचारी रस्त्यावर उतरविले आहेत. यामुळे वसुली मोहीम राबवत ३१ मार्च पर्यंत नगरपालिकेने १५ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आर्थिक वर्षाचा आता शेवटचा महिना बाकी राहिला आहे. यामुळे थकीत बिलांची तसेच थकीत कराची रक्कम वसुली करण्याची मोहीम राबविली जात आहे. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार असल्याने जास्तीत जास्त वसुली कशाप्रकारे होईल यावर महापालिका व नगरपालिकांच्या भर राहणार आहे. यामुळे थकीत कराची रक्कम भरणा करणाऱ्यासाठी काही पालिकांनी सूट देखील जाहीर केली आहे. याला करदात्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असतो.
वाशीम पालिकेचे १५ कोटींचे उद्दिष्ट
वाशिम नगरपालिकेचे कर्मचारी सध्या कर वसुलीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. वार्षिक १५ कोटीचे कर वसुलीचे उद्दिष्ट ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्यासाठी च्या नगरपालिकेचे सर्वच कर्मचारी सध्या कर वसुलीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यात नगरपालिकेचे सीईओ यांच्यासह बांधकाम विभाग, कर वसुली विभाग व इतर विभाग ही कर वसुलीत सहभागी झाले आहेत. अनेकांकडे कर वसुली थकल्यामुळे नगरपालिकेचा कर वसूल करण्यासाठी वाशिम नगरपालिकेने धडक मोहीम राबवत रस्त्यावर उतरून कर वसुली सुरू केली आहे.
१० कोटी रुपयांची झाली वसुली
शेकडो मालमत्ताधारक व शासकीय कार्यालयांकडून मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मागील महिनाभरापासून वसुली मोहीम राबविली जात आहे. याला करदाते चांगला प्रतिसाद देखील देत आहेत. याच कारणाने नगरपालिकेने आतापर्यंत दहा कोटीच्या जवळपास कर वसुली पूर्ण झाली आहे. तर उर्वरीत पाच कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेने कर वसुलीसाठी कंबर कसली असून ३१ मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.