Tasgaon : शासकीय विश्रामगृहात मद्यपान करून धुडगूस: तासगावमध्ये एका महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रकार
esakal February 24, 2025 08:45 PM

तासगाव : येथील एका महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला आलेल्या एका टोळक्याने शासकीय विश्रामगृहात मद्यपान करून आज धुडगूस घातला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी त्या सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

येथील एका महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता. या मेळाव्यासाठी बार्शी येथील एका माजी विद्यार्थ्याने ऑनलाईन आरक्षण केले होते. आज सकाळी तासगाव व पलूस भागातील माजी विद्यार्थी शासकीय विश्रामगृहावर एकत्रित आले. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच दिवसांनी सगळे मित्र एकत्रित आल्याने धिंगाणा सुरू झाला.

भरदिवसा सकाळ- सकाळी विश्रामगृहात सुरू असलेला धिंगाणा तेथे काही कामानिमित्त गेलेल्या नागरिकांच्या लक्षात आला. आवाज आणि दंगा वाढल्यानंतर हा सारा प्रकार विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. अनेक जण एकत्र आल्याने यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातली. आणि या टोळक्याला बाहेर काढण्यात आले.

ज्याने विश्रामगृहामधील कक्ष आरक्षित केला होता त्याने आपले मित्रमंडळींना तेथे बोलवून माजी विद्यार्थी मेळाव्याला जायच्या आधीच हा ‘कार्यक्रम’ लावला होता. मात्र दंगा वाढल्याने बाहेर पडायची वेळ आली. मात्र या प्रकारानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची काम करण्याची पद्धत चव्हाट्यावर आली आहे. विश्रामगृहात सुरू असलेले प्रकार पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून थांबवण्याची आवश्यकता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.