मुंबई : नवी दिल्ली येथील साहित्य संमेलनात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले विधान मूर्खपणाचे होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोऱ्हे यांना फटकारले. तसेच गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या मिळवलेल्या चार टर्म आणि केलेल्या राजकीय प्रवासाचा पवार यांनी अक्षरशः पंचनामा केला.
नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपानंतर शरद पवार यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘नीलम गोऱ्हे यांनी संमेलनात जे भाष्य केले, ते करण्याची गरज नव्हती. गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी मिळाली आहे. त्यांना या चारही टर्म कशा मिळाल्या, याची सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. गोऱ्हे यांनी कोणत्यातरी गाडीचा उल्लेख केला. तो करायला नको होता.
नीलम गोऱ्हे या सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात होत्या. नंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होत्या. त्यानंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. हल्ली त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. एका मर्यादित कालावधीत त्यांनी जवळपास चार पक्षांचा अनुभव घेतला आहे. त्यांचा जो काही अनुभव आहे, तो लक्षात घेता त्यांनी ते भाष्य केले नसते तर योग्य ठरले असते. यासंबंधी संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका शंभर टक्के योग्य आहे. संमेलनाच्या आयोजकांनीही याबाबत नापसंती व्यक्त केली आहे. त्यामुळे या सगळ्यावर आता पडदा टाकायला हरकत नाही.’’
‘संमेलनात वाद होतातच’साहित्य संमेलनाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘‘या साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांनी त्याठिकाणी उपस्थिती लावली. साहित्य संमेलनात काही ना काही वाद होतातच. साहित्य संमेलनाचे इतर कार्यक्रम तालकटोरात झाले. वादाचे स्वरूप गंभीर नव्हते. साहित्य संमेलन यशस्वी झाले.’’