पुण्यातील स्वारगेट डेपोत झालेल्या पीडित तरूणीवर लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण राज्य हादरलंय. या प्रकरणी तब्बल ७५ तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्याला अटक झालीय. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानं कोठडीत टाहो फोडत चुक कबूल केली आहे.
''माझं चुकलं, मी पापी आहे''. असं म्हणत आरोपी दत्ता गाडे कोठडीत टाहो फोडत रडला आहे. 'मी तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध आले आहेत', असा धक्कादाक दावाही त्यानं केला आहे. गाडेनं हा दावा पोलीसांसमोर केला आहे. या प्रकरणी पोलीस दत्ता गाडेची कसून चौकशी करत आहेत.
"सर्च ऑपरेशन"
झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी दत्ता गाडेला मध्यरात्री शिरूरमधून शिताफीने पकडले. आरोपीला पकडण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेऊन होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार रात्री उशिरापर्यंत संपूर्ण "सर्च ऑपरेशन" ची माहिती शिरूरमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांकडून घेत होते.
तसेच सूचना सुद्धा देत होते. दुपारी शिरूरमध्ये दाखल झालेल्या सहआयुक्त रंजन कुमार यांच्याकडून तसेच इतर अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी माहिती घेण्याचं काम रात्री ९ पर्यंत सुरू होते. त्यानंतर आयुक्त अमितेश कुमार घरी गेल्यानंतर सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांशी "कॉन कॉल" वरून सूचना आणि मार्गदर्शन देत होते. रात्री २.१५ वाजता आरोपी गाडेला शिरूर येथून ताब्यात घेत पुण्यात आणले आहे.