AFG vs AUS Live : पावसाने 'गोंधळ' घातला! ऑस्ट्रेलिया अन् अफगाणिस्तान यापैकी कोण जाणार उपांत्य फेरीत? आफ्रिकेचे टेंशन का वाढले?
esakal March 01, 2025 10:45 AM

Afghanistan vs Australia, : ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात करताना अफगाणिस्तानला टेंशन दिलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या ब गटातील त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. पण, सध्या मुसळधार पावसाने बाजी मारलेली दिसतेय. संपूर्ण मैदान झाकण्यात आले आहे आणि प्रचंड पाणी साचले गेले आहे. त्यामुळे हा सामना होण्याची शक्यताच कमी आहे. हा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल आणि मग पुढे काय?

अफगाणिस्तानने ब गटातील त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात समोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवले. सेदीकुल्लाह अटलने ९५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. अझमतुल्लाह ओमारजाई शेवटच्या षटकातपर्यंत मैदानावर उभा राहिला आणि ६३ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ६७ धावांची खेळी करून माघारी परतला. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ २७३ धावांवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाकडून बेन डॉरश्यूईसने ३, तर स्पेन्सर जॉन्सन व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाला मॅथ्यू शॉर्ट व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. शॉर्ट १५ चेंडूंत २० धावांवर झेलबाद झाला. परंतु त्यापूर्वी अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी तीन सोपे झेल टाकले आणि झेल सोडणाऱ्यांमध्ये राशिद खान हा एक होता. ऑस्ट्रेलियाने पाच षटकांत अर्धशतक पूर्ण केले. अफगाणिस्तानकडे अव्वल दर्जाचे फिरकीपटू आहेत, याची जाण ऑसींना होती. त्यामुळेच ट्रॅव्हिस हेडने त्यांच्या जलदगती गोलंदाजांनावर पॉवर प्लेमध्ये आक्रमक केले आणि खोऱ्याने धावा चोपल्या.

हेडने ४० चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५९ धावांची खेळी केली आणि संघाला १२.५ षटकांत १ बाद १०९ धावांपर्यंत पोहोचवले. त्यावेळी पाऊस आल्याने सामना थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये ९० धावा चोपल्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी श्रीलंकेने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८७ धावा केल्या होत्या. हेडला स्मिथ ( १९) साथ देतोय.

  • सामन्यात गुण वाटून घेतले गेले, तर ऑस्ट्रेलिया चार गुणांवर जाईल आणि त्यांचे उपांत्य फेरीसाठी पात्र होणे निश्चित होईल. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत केले, तर ते पाच गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवतील. पण जर इंग्लंड जिंकला, तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान प्रत्येकी तीन गुणांवर राहतील आणि त्यानंतर नेट रन रेट (NRR) महत्वाचा ठरेल.

  • अफगाणिस्तानचा सध्याचा NRR -0.99 असल्यामुळे त्यांचे बाहेर पडणे निश्चित मानले जाऊ शकते, कारण त्यांना पात्र ठरण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा किमान २०७ धावांनी पराभव आवश्यक आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.