युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की यांनी शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोघांच्या बैठकीनंतर जाहीर पत्रकार परिषदेत दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. ट्रम्प यांनी जेलेंस्कीना चार गोष्टी सुनावल्या. डोनाल्ड ट्रम्प थेट टीव्ही कॅमेऱ्यांसमोर जेलेंस्की यांना ओरडले. ‘तुम्ही युद्ध हरत आहात. तुमच्या हातामध्ये काही कार्ड नाहीय’ असं जेलेंस्कींना थेट सांगितलं. “तुम्ही आमचा अनादर करताय. आपली वाटचाल तिसऱ्या विश्व युद्धाच्या दिशेने सुरु आहे. तुम्हाला अशा प्रकारे खेळण्याचा काही अधिकार नाही. उलट तुम्ही आमचे आभार मानले पाहिजेत. अशा पद्धतीने काम करणं कठीण होऊन बसेल” असं ट्रम्प जेलेंस्कींना म्हणाले.
“आम्हाला काय वाटेल हे तुम्ही सांगू नका. आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाल काय वाटेल हे ठरवण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही नाही आहात. आम्हाला खूप चांगलं वाटतय आणि आम्ही मजबूत आहोत. तुम्हीच स्वत:ला वाईट स्थितीमध्ये टाकत आहात” असं ट्रम्प यांनी सुनावलं. “सध्या तुमच्या हातात कार्ड्स नाहीयत. तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी जुगार खेळताय. तुम्ही तिसऱ्या जागतिक युद्धाचा जुगार खेळताय. तुम्ही जे करताय तो देशाचा अनादर आहे. तुमचा देश संकटात आहे. तुम्ही जिंकण्याच्या स्थितीत नाही. आम्ही तुम्हाला मदत केली. आम्ही तुम्हाला लष्करी शस्त्र दिली. तुमचे सैनिक शूर आहेत. पण त्यांनी आमच्या लष्कराचा वापर केला. आमची शस्त्र जर तुम्हाला मिळाली नसती, तर दोन आठवड्यांच्या आत हे युद्ध संपलं असतं” असं ट्रम्प म्हणाले.
‘हे अपमानास्पद आहे’
‘एकतर रशियाशी तडजोड करा किंवा आम्ही बाहेर पडू’ असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जेलेंस्कींना सरळ सांगितलं. त्याचवेळी ट्रम्प यांच्या शेजारी बसलेले अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी सुद्धा जेलेंस्की यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला. “ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकन मीडियासमोर ट्रम्प यांच्याशी हुज्जत हे अपमानास्पद आहे” असं जेडी वेंस म्हणाले. वेंस यांनी जेलेंस्कीना विचारल, तुम्ही एकदातरी आभार मानलेत का?. त्यावर जेलेंस्कींनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मध्येच त्यांना रोखण्यात आलं. युक्रेनला रशियासोबत तडजोड करुन युद्ध संपवाव लागेल असं ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर या शाब्दीक वादावादीला सुरुवात झाली.
जेलेंस्की काय म्हणाले?
“आमच्या क्षेत्रातील एका मारेकऱ्याबरोबर कुठलीही तडजोड करता कामा नये. पागल रशियन्सनी युक्रेनी मुलांना निर्वासित केलय. तीन वर्षापासून सुरु असलेल्या या युद्धात रशियन्सनी युद्ध गुन्हे केले आहेत असं जेलेंस्की म्हणाले.