Rare Astronomy : आकाशात सात चंद्र एकावेळी पाहण्याची संधी!
esakal March 01, 2025 04:45 PM

अकोला : मार्च महिन्यात वसंत ऋतुचे आगमन होणार आहे. त्यामुळे वातावरणात बदल दिसून येत आहेत. या ऋतू बदलाच्या काळात दोन मार्चपासून पंधरा दिवस पश्चिम आकाशात एक साथ सात चंद्र बघता येतील. त्याचा खगोल व निसर्गप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

चंद्र आपल्या बालपणीचा मित्र, आईचा प्रतिकात्मक भाऊ आणि त्याच्या रोज बदलत्या कलांचे आकर्षण सर्वांना असते. येत्या दोन मार्चपासून पंधरा दिवस पश्चिम आकाशात एक साथ सात चंद्र बघता येतील. यामध्ये एक आपला चंद्र, दूसरा शुक्राची कोर आणि तिसरा बुध ग्रहाच्या कलेचा आकार चंद्राप्रमाणे पाहता येईल. सोबतच सध्या वृषभ राशीतील गुरू ग्रह व त्याच्या एकूण ९५ चंद्रापैकी गनिमीड, आय.ओ., युरोपा आणि कॅलिस्टो या चार मोठ्या चंद्रांचे दर्शन दुर्बिणीतून चांगल्या प्रकारे घेता येईल.

या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड खगोल निरीक्षक यांनी केले आहे. यावेळी प्रथम आपला चंद्र नंतर पश्चिम आकाशात विलोभनीय दर्शन देणारा सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह सहज लक्ष वेधून घेत आहे. या ग्रहाचे दुर्बिणीतून दर्शन केल्यास चक्क आपल्या चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे शुक्र ग्रहाची कोर आणि बुध ग्रह दशमीच्या चंद्र कलेप्रमाणे दिसेल. बुध ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने या ग्रहाचे दर्शन क्षितिजापासून कमी अंतरावर असल्यामुळे हा ग्रह फार कमी वेळ दर्शना साठी उपलब्ध असतो.

२६ मार्चपासून शुक्राचे पहाटे दर्शन

बुध व शुक्र ग्रह सध्या पश्चिम आकाशात मीन राशीत असून २ मार्चला शुक्र आणि १५ मार्चपासून बुध ग्रह वक्री होत आहेत. अर्थात हे दोन्ही ग्रह उलट फिरत असल्याचा भास होईल. विशेष म्हणजे १९ मार्चला बुध आणि शुक्र ग्रहाचा एकाच दिवशी पश्चिमेस अस्त होईल.

शुक्र २६ मार्चपासून आणि बुध ग्रह १ एप्रिलपासून पहाटे पूर्व क्षितिजावर दिसायला लागेल. मध्यंतरी २ मार्चला चंद्र शुक्रासोबत व ६ ला गुरु ग्रहाचे जवळ आणि ९ रोजी चंद्र मंगळ ग्रह युती बघता येईल. ११ रोजी बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह युती स्वरूपात एकमेकांच्या अगदी जवळ असतील. ही एक दुर्मिळ संधी असेल. हा एक आगळावेगळा अनुभव असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.