Akshay Wakhare Retires : ३४४ विकेट्स नावावर असलेल्या भारतीय खेळाडूची निवृत्ती; अक्षय वखरेचा क्रिकेटला रामराम
esakal March 03, 2025 07:45 PM

नागपूर, ता. २ : विदर्भाला गेल्या २० वर्षांमध्ये स्वबळावर अनेक अविस्मरणीय सामने जिंकून देणारा अनुभवी ऑफस्पिनर अक्षय वखरे याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. याबरोबरच गेल्या दोन दशकांपासूनची अव्याहतपणे सुरू असलेली इनिंगही संपुष्टात आली आहे.

अक्षयचा समावेश असलेल्या विदर्भ संघाने आज रविवारी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर केरळचा पराभव करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर पत्रकारांसोबत आपल्या भावना व्यक्त करताना अक्षयने निवृत्तीच्या घोषणेचा खुलासा केला. तो म्हणाला, इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर निवृत्तीची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटले. त्यामुळेच सामन्याआधी मी व्हीसीएला आपला निर्णय कळविला. नशिबात जितके होते, ते सर्व मला मिळाले. महत्त्वाचा सामना असल्याने खेळणे आवश्यक होते. दुर्दैवाने अकरा खेळाडूंमध्ये मला स्थान मिळू शकले नाही. पण एकंदरीत कारकिर्दीवर खुश आहे. कसलीही नाराजी नाही. आता काही दिवस आराम करणार आहे. त्यानंतरच भविष्याचा विचार करणार आहे. विदर्भ संघात हर्ष दुबे व पार्थ रेखडेसारखे मेहनती युवा फिरकीपटू असून, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. देशाचे प्रतिनिधित्व करण्याचीही त्यांच्यात क्षमता असल्याचे अक्षयने सांगितले.

नोव्हेंबर २००६ मध्ये केरळविरुद्ध पलक्कड येथे रणजी पदार्पण करणारा ३९ वर्षीय अक्षय कारकिर्दीतील अखेरचा रणजी सामना गेल्या फेब्रुवारीमध्ये तमिळनाडूविरुद्ध जामठा स्टेडियमवर खेळला होता. मितभाषी व शांत स्वभावाच्या अक्षयने १०५ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये २८.४२ च्या सरासरीने एकूण ३४४ बळी टिपले. यात ७० धावांमध्ये घेतलेले सात बळी त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने २१ वेळा पाच आणि तीनवेळा दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.

याशिवाय ६२ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २६.२९ च्या सरासरीने ५३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमधील ६० सामन्यांमध्ये अक्षयच्या नावावर एकूण ६३ बळी आहेत. याशिवाय फलंदाजीतही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तीन अर्धशतकांसह १०४८ धावा केल्या आहेत. याशिवाय फलंदाजीतही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तीन अर्धशतकांसह १०४८ धावा केल्या आहेत.

दानिश मालेवार, सामनावीरमाझ्यासाठी हा सीझन खूपच चांगला राहिला आहे. उल्लेखनीय म्हणजे, संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो याचा मला सर्वाधिक आनंद आहे. या सीझनमध्ये करुण नायरसारख्या वरिष्ठ व अनुभवी खेळाडूंकडून खूप काही शिकायला मिळाले. सोबत फलंदाजी करीत असताना करुण सातत्याने मला मार्गदर्शन करून माझा आत्मविश्वास वाढवत होता. मी यापूर्वी अनेकवेळा ५०-६० धावा काढून बाद झालो. झालेल्या चुकांवर मी काम केले. त्याचा फायदाही झाला. अंतिम सामन्यात शतकी खेळी करून संघाला विजेतेपद मिळवून देणे, यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही. भविष्यातही अशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

क्रिकेटचा आतापर्यंतचा प्रवास खुपच छान राहिला आहे. आमच्या संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले, याचा निश्चितच आनंद आहे. माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अक्षय भैय्यासाठी आम्ही ही ट्रॉफी जिंकू शकलो, याचा जास्त आनंद आहे. ऑफसीझनमध्ये मी फिटनेस व स्कीलसह फलंदाजी व गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली. त्याचा खूप फायदा या सीझनमध्ये झाला. भविष्यात टीम इंडियाकडून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न आहे. त्या दृष्टीने मी आणखी मेहनत घेऊन मी आपले स्वप्न साकार करणार आहे, असे मालिकावीर हर्ष दुबेने म्हटले.

अक्षयसाठी निवृत्तीचा निर्णय माझ्यासाठीही भावनिक क्षण आहे. त्याचे करिअर खूप चांगले राहिले आहे. विदर्भाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, तो दर्जेदार फिरकीपटू-सोबतच चांगला व्यक्ती व माझा उत्तम मित्रही आहे, असे मत व्यक्त करून अक्षयच्या भावी वाटचालीबद्दल माजी कर्णधार फैज फजलने शुभेच्छा दिल्या.

अक्षयने विदर्भासाठी दिलेल्या योगदानाचा मला आनंद व अभिमान आहे. उच्च शिखरावर राहून क्रिकेटमधून निवृत्त होणे, यापेक्षा दुसरा चांगला क्षण असूच शकत नाही. त्याच्या मार्गदर्शनाचा विदर्भाच्या युवा खेळाडूंनाही खूप फायदा झाला आहे. पुढील वाटचालीसाठी त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असे मत विदर्भाचे प्रशिक्षक उस्मान घनी यांनी मांडले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.