सिन्नर- येथील सरकारी इमारतींच्या परिसरात महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ९० स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. तीन टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर पोलिस ठाणे व सिन्नर न्यायालय येथे दहा हजार चौरस मीटर परिसरात स्वच्छता करण्यात आली.
या वेळी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, हवालदार आप्पासाहेब काकडे, समाधान बोऱ्हाडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी, आरोग्य अधिकारी रवी देशमुख यांचे मोहिमेसाठी सहकार्य लाभले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे समाजसेवेचे हे कार्य ८५ वर्षांपासून सुरू असून, या कार्याची नोंद जगभरात अनेक देशांमध्ये घेण्यात आलेली आहे. स्वच्छता मोहिमेसह कूपनलिका पुनर्भरण, रक्तदान शिबिर, कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र वाटप, आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदी काम केले आहे.