चेतन व्यास
वर्धा : वर्धा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून अवैध वाळूची वाहतूक सुरु होती. याबाबतची माहिती सहायक पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांना मिळाली. यावरून नाकाबंदी करत गिरडकडून जामकडे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ६ ट्रकवर कारवाई करत वाळूची तस्करी रोखली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यासंबंधी १४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल मंत्र्यांकडून वाळू माफियावर अंकुश लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. मात्र अधिकाऱ्यांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधातून वाळूची अवैध वाहतूक सुरुच असल्याचे बोलले जात आहे. अशात जिल्ह्यात वाळू उपसा करता येत नसल्याने भंडारा जिल्ह्यातून वाळूची अवैधपणे वाळूची वाहतूक केली जात होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. वर्धा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत आहे. बाहेर जिल्ह्यातून वाळू आणत जिल्ह्यात मोठ्या दरात वाळू विकली जात आहे. ही सर्व वाळू बिना रॉयल्टी असून यात शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. नी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियाचे धाबे दणाणले आहे.
एकामागून एक वाळूचे ट्रक
दरम्यान पोलिसांना रात्री गस्ती दरम्यान गिरडकडून जामकडे मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी समुद्रपुर येथे सापळा रचून नाकाबंदी केली. यावेळी एका मागे एक ट्रक येतांना दिसले. सदरचे ट्रक थाबंवून विचारपुस केली असता त्यांनी वाहनामध्ये रेती असल्याचे सांगितले. ट्रकची ताडपत्री काढून पाहणी केली असता सर्व वाहनात गौण खनिज तांबडी पांढरी रेती असल्याचे दिसुन आली.
१४ जणांवर गुन्हा दाखल
रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदर वाळू भंडारा येथुन वाहन मालकाच्या सांगण्यावरून भरून आणल्याचे चालकांकडून सांगण्यात आले. यावेळी पोलिसांनी तब्बल १ करोड ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून शेख रशिद (रा. अमरावती), मनिल धुर्वे (रा. कसाईखेडा अमरावती), जुबेर खान (रा. अमरावती), अतुल भगत (रा. हुसनापुर ता. देवळी, जि. वर्धा, निकेश मेश्राम (रा. कारला चौक, वर्धा), प्रतिम उईके (रा. सेलडोह, ता. सेलु जि. वर्धा), पंकज मडावी (रा. सेलडोह, ता. सेलू जि. वर्धा), बबलू उर्फ ईरशाद पठाण (रा. वर्धा, पसार), शेख नसीब (रा. ताजनगर अमरावती), गौसीन खान (रा. वर्धा पसार), शैलेश शेंद्रे (रा. तिगांव वर्धा), तुषार सोनटक्के (रा. सेलडोह, ता. सेलु जि. वर्धा), अजहर खान (रा. वर्धा), शेख रूबेज (रा. स्टेशनफैल, वर्धा) या १४ जणाविरोधात समुद्रपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.