Maharashtra Politics News live : वाद झाल्यानंतर भय्याजी जोशींचे स्पष्टीकरण; म्हणाले, महाराष्ट्र, मुंबईची भाषा मराठीच..!
Sarkarnama March 06, 2025 11:45 PM
Marathi in Mumbai News : भय्याजी जोशी यांचे स्पष्टीकरण

मराठीविषयी वादग्रस्त विधान केलेले आरएसएसचे भय्याजी जोशी यांनी याबाबत आज स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मुंबईत राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे. माझ्या विधानामुळे गैरसमज निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा मराठीच, यात दुमत नाही. सांस्कृतिक दृष्टीने अभ्यास करावा, अशी आपली भाषा असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचे नामांतरण करण्याची मागणी

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे नामांतरण करावे, अशी मागणी भाजप आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करावे, महाराजांच्या नावाचा सन्मानपूर्वक उल्लेख व्हावा, अशी मागणी महाडिक यांनी केली आहे.

Mahavikas Aghadi News : उद्धव ठाकरे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार

मराठी भाषेबाबत आरएसएसचे भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मविआच्या आमदारांकडून मुंबईतील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित आहेत.

Prashant Koratkar News : कोरटकरचा मोबाईल पोलिसांना मिळाला

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीही आक्षेपार्ह विधान केले होते. पोलिस त्याचा शोध घेत असून त्याचा मोबाईल आढळून आला आहे. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागू शकतो.

Anjali Damania News : अंजली दमानिया ठिय्या आंदोलन करणार

बीड आणि जालन्यातील तरूणांना मारहाणप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहे. या घटनांच्या निषेधार्थ त्या उद्या विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

Cabinet Meeting : विमानतळाला गुलाबराव महाराजांचे नाव?

अमरावती विमानतळाला गुलाबराव महाराजांचे नाव देण्याची चर्चा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे समजते. याबाबतचा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्याबाबतही चर्चा झाली आहे. बैठकीत अन्य काही महत्वाच्या मुद्यांवरही चर्चा झाली.

Santosh Deshmukh : संतोष देशमुख खूनप्रकरणी दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको

संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना यांच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संशयित आरोपीच्या फोटोला काळे फासत त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी या वेळी आंदोलकांकडून करण्यात आली

Budget Session : विधानसभेत गोंधळ; सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात ‘मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे,’ असे काही नाही, असे विधान केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उठलेल्या आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांनी बोलू दिले, त्यामुळे वाढलेल्या गोंधळामुळे सभागृह तहकूब करावे लागले

Vasant More : अजित पवार एवढे दिवस झोपले होते का?, वसंत मोरेंचा सवाल

संतोष देशमुख यांचे व्हायरल फोटो पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे हे आज प्रचंड आक्रमक झाले होते. या खूनप्रकरणातील सर्व आरोपींचे पुतळे बनवून त्यांना पुण्यातील कात्रज चौकात एकाच वेळी फाशी देण्यात आली. राज्यभरातील चौकाचौकात या आरोपींचे पुतळे बनूवन त्यांना फाशी द्यावी. एवढे दिवस अजित पवार झोपले होते का, असा सवाल मोरे यांनी केला.

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राहणाऱ्याला प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे : देवेंद्र फडणवीस

मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे, असे काही नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही

Kolhapur Police live: डॉ. प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात पोलिसांनी कोर्टात धाव

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या धमकी देणारे डॉ. प्रशांत कोरटकर यांना अटक करा, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी डॉ. प्रशांत कोरटकर यांना अंतरिम जमीन मिळाला आहे. मात्र याबाबत कोल्हापूर पोलिसांची उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरटकर अटक करण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस नागपूरला रवाना झाले होते, पण कोरटकर मध्य प्रदेशात फरार झाले होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकर याला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Case: सकल मराठा समाज आक्रमक

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पंढरपुरात फाशी देण्यात आली.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज पंढरपुरात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Maharashtra Politics live : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजता विधानभवनात ही बैठक होईल. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाल्यानंतक मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे बघणं महत्त्वाचं असेल.

Sanjay Raut live:हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?

भैय्याची जोशी यांचे मराठी भाषेविषयी केलेले विधान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईची भाषा ही मराठी नाही, असे विधान भैय्याची जोशी यांनी केले आहे. त्यावर राऊत यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धिक्कार करणार का? असा खडा सवाल राऊतांनी केला आहे.

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुलढाण्यात सर्व पक्षीय धरणे आंदोलन

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर आता संतापाची लाट राज्यभर उसळली आहे. याप्रकरणी आज (ता.6) बुलढाण्यात सर्व पक्षीय धरणे आंदोलनं करण्यात आले आहे. वालमिक कराडसह सर्व आरोपीना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. तसेच धनंजय मुंढेंची देखील सीआयडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.

Jaykumar Gore News : मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून अखेर हक्कभंग दाखल

महिलेला फोटो पाठवल्याच्या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी काल (ता.5) विधीमंडळाबाहेर स्पष्टीकरण दिले होते. तसेच मला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. पण आता काही लोक मला बदनाम करत असत आहेत. यामुळे आता त्यांचाविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. तो आता त्यांनी दाखल केला आहे. जयकुमार गोरे यांच्याकडून संजय राऊत, रोहित पवार आणि लयभारी युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar News : मुंडेंच्या कारभार अजितदादांच्या हातात

बीड हत्याकांडामुळे अडचणी आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे त्यांच्या जागी आता नवा चेहरा कोण? कोणाला संधी मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांनी आपल्याकडे घेतला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आपल्याकडे घेतला आहे.

MVA Kolhapur News : कोल्हापूरमध्ये फडणवीस येण्याआधीच मविआच्या नेत्यांची धरपकड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असून प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. कोल्हापुरात याच मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा मविआच्या नेत्यांनी दिला होता. पण आता फडणवीस येण्याआधीच मविआच्या नेत्यांची धरपकड पोलिसांकडून केली जातेय.

Rahul Gandhi News : राहुल गांधी आज मुंबईत

धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, आता काँग्रेस नेते राहुल गांधी येथे भेट देणार आहेत. आज ते मुंबईत येणार असून धारावीला भेट देतील.

MVA NEWS : महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठक

विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला गेल्या तीन दिवसात विविध मुद्द्यावरून घेरलं आहे. अशातच महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वड्डेटीवर यांच्या उपस्थितीत होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ही बैठक सायंकाळी 4 वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे.

Manikrao Kokate News : कोकाटेंवरही राजीनाम्यासाठी दबाव वाढणार?

अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली असलीतरीही त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला आहे. यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची आज लावून धरली जाऊ शकते.

Maharashtra Budget Session News : आजच्या चौथ्या दिवशीही विधीमंडळाचे तापमान वाढणार

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी सुरू झाले असून ते 26 मार्च रोजी संपणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार सादर करतील. पण आजच्या चौथ्या दिवशीही . अबू आझमी निलंबन आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.