आंबेठाण : उत्तराखंड येथील मत्स्य शेतकऱ्यांचा शिवे ( ता.खेड ) येथे मत्स्य व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी दौरा झाला.उत्तराखंड येथून आलेल्या या पथकात १३ मत्स्यशेतकरी,दोन अधिकारी यांचा समावेश होता.पुणे जिल्ह्यातील शिवे येथील आदिवासी पश्चिम विभाग मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या कामकाजाची यावेळी पाहणी करण्यात आली.
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची कामे कशी पार पाडली जातात या बाबत आदिवासी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके यांनी माहिती दिली.तसेच मासेमारीचे नियोजन,व्यवस्थापन व मासेमारी प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले.शासकीय योजनेची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
या पथकासोबत उत्तराखंड सहकार विभागाचे धीरज सिंग,पुणे विभागाचे सहाय्यक निबंधक यांच्या वतीने कोटकर सर उपस्थित होते. या पथकाला जुन्नर येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी किरण वाघमारे यांनी महाराष्ट्रातील मत्स्यपालनाबाबत माहिती दिली.
उत्तराखंड शासनाकडून दर वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्रगतशील मत्स्यशेतकरी यांची निवड केली जाते. त्यांना तीन वेगवेगळ्या ग्रुपमधून राज्यात अभ्यास दौऱ्या करीता पाठविण्यात येतात व त्यांचा सर्व खर्च शासनाकडून केला जातो असे यावेळी उत्तराखंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवे गावचे सरपंच अक्षय शिवेकर,सोसायटी अध्यक्ष शिवाजी शिवेकर,ग्रामपंचायत अधिकारी उल्हास कोरडे,संस्थेच्या उपाध्यक्षा सुलाबाई बोरकर, सचिव दत्तात्रय गावडे यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते. अभ्यास दौऱ्याकरिता संस्थेची निवड केल्याबद्दल प्रादेशिक आयुक्त विजय शिखरे,सहाय्यक आयुक्त अर्चना शिंदे,सहाय्यक निबंधक सुधीर खंबायत यांचे आभार मानले.