छत्रपती संभाजीनगर : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) प्रत्येक क्षेत्रात शिरकाव होत आहे. त्याला आता सर्वांचा आवडता असलेला धूलिवंदनाचा सणही अपवाद राहिला नाही. यंदा बाजारपेठेत नेहमीच्या पिचकाऱ्या आल्या आहेत.
पण, आपोआप सेन्सरने रंग उडवणारी आणि सोबत होळीची गाणी म्हणणारी पिचकारी सर्वांचे आकर्षण ठरत आहे. ही पिचकारी चार्जिंगवर चालते. याशिवाय होळीच्या विविध साहित्यानेही बाजारपेठ सजली आहे.
होळी आणि धूलिवंदन हा रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण रंगांची उधळण करीत या सणाचा आनंद घेतात. विशेषतः लहान मुले आठवडाभर आधीपासूनच तयारीला लागतात. यामुळे बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य दाखल झाले.
लहान मुलांसाठी खास म्युझिकल (एआय आधारित) पिचकारी, चार्जिंग पिचकारी, कलर भरण्यासाठी सिलिंडर, कलर ग्लास, पाणी फुगे यांनी बाजारपेठ सजली आहे. या शिवाय होळी स्लोगन असलेले टी-शर्ट उपलब्ध आहेत. रासायनिक रंगांसोबतच आता नैसर्गिक हर्बल रंगांचाही वापर वाढताना दिसत आहे. ग्राहकांकडून नैसर्गिक रंगांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
अशा आहेत किमती (रुपयांत)
हर्बल रंग ः २० ते ४००
सिकंदर रंग ः ३०
चार्जिंग पिचकारी ४०० ते ९००
(एआय) पिचकारी ४०० ते ९००
कलर स्मोक १२० ते ३००
कलर स्प्रे १५ ते १००
कलर स्मोक स्प्रे ३० ते ८०
वॉर्निश रंग १०
साधी पिचकारी १० ते १,०००
चंबू ३५
कलर सिलिंडर ६०० ते २०००
कलर ग्लास ३०
होळी स्लोगन टी-शर्ट १०० ते १५०
यंदा नैसर्गिक रंगांचीही खरेदी होत आहे. रंगपंचमीच्या दोन दिवस आधी ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होते. मात्र, सध्या लहान मुले फुगे खरेदी करून जात आहे. लहान मुलांसाठी कलर सिलिंडर, कलर ग्लास, टॅंक विक्रीसाठी आहेत.
— सिद्धांत बसैये, विक्रेते