वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील (WPL 2025) 19 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर 9 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईने गुजरातविरुद्ध 179 धावांचा यशस्वी बचाव केला. गुजरातला विजयासाठी 180 धावांचं आव्हान मिळालं होतं.मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला 20 ओव्हरमध्ये 170 धावांवर गुंडाळलं आणि 9 धावांनी विजय मिळवला. मुंबईचा हा हंगामातील एकूण पाचवा तर गुजरातविरुद्धचा दुसरा विजय ठरला. मुंबईने या विजयासह गुजरातला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
गुजरातकडून भारती फुलमाली हीने सर्वाधिक 61 धावांचं योगदान दिलं. तर हर्लीन देओल हीने 24 धावा जोडल्या. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी या दोघींव्यतिरिक्त इतर एकीलाही 20 धावांच्या पुढे जाऊ दिलं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने झटके देत गुजरातला गुंडाळण्यात यश मिळवलं. मुंबईकडून हॅली मॅथ्यूज आणि अमेलिया केर या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तसेच शबनिम इस्माईल हीने दोघींना मैदानाबाहेर पाठवलं. तर संस्कृती गुप्ता हीने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
त्याआधी गुजरातने टॉस जिंकून मुबंईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 179 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सर्वाधिक 54 धावांचं योगदान दिलं. नॅट सायव्हर ब्रँट हीने 38 धावा जोडल्या. हॅली मॅथ्यूज आणि अमनज्योत कौर या दोघींनी प्रत्येकी 27-27 धावा जोडल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. तसेच गुजरातकडून तनुजा कंवर, काश्वी गौतम, प्रिया मिश्रा आणि कर्णधार ॲशले गार्डनर या चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान मुंबईने या विजयासह गुजरातला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. तर गुजरातची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई 7 सामन्यांमधील 5 विजयांसह +0.298 नेट रनरेटसह दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. तर गुजरातने 8 पैकी 4 सामने जिंकले आणि तितकेच गमावले. गुजरातचा नेट रनरेट हा +0.228 असा आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, सजीवन सजाना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि पारुनिका सिसोदिया.
गुजरात जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : ॲशले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, काशवी गौतम, सिमरन शेख, फोबी लिचफिल्ड, भारती फुलमाली, तनुजा कंवर, मेघना सिंग आणि प्रिया मिश्रा.