मनाला करा स्वच्छंद..!
esakal March 12, 2025 10:45 AM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

‘Battles are won in mind, not on ground.’ किती महत्त्वपूर्ण वाक्य आहे. आपले मन शांत असेल तर घेतलेले निर्णय अचूक असतात. आपल्या यशात, अभ्यास, खेळ, व्यवसाय असो किंवा नोकरी-करिअरच्या प्रत्येक टप्प्यात मनाचा समतोल ठेवणे महत्त्वाचे असते.

डिजिटल माध्यमामुळे बऱ्याच गोष्टी सहज उपलब्ध होतात. त्याबरोबर त्यांचे दुष्परिणामही आहेतच. शहरीकरण किंवा इतर कारणांमुळे एकत्रित कुटुंब पद्धतीचा संकोच झाला आहे. कौटुंबिक संवाद कमी झाला आहे. याचा करिअरशी काय संबंध? तर थेट नाते आहे. मनातले विचार प्रकट करून, चर्चा करून कुठल्याही प्रश्नाचे सोपे उत्तर शोधण्याची कला हळूहळू लोप पावत आहे.

एकटेपणामुळे, दुसऱ्यांवर ‘विश्वास’ ठेवणे बंद होत आहे. मनात नको त्या गोष्टी घर करून समज-गैरसमज होऊन आपले निर्णय चुकतात. आणि आपले मानसिक संतुलन बिघडायला सुरवात होते. आपले मन हे सुपीक जमिनीसारखे असल्यामुळे त्यावर ताबा, संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी योगासन, ध्यानधारणा, खेळ, संगीत या सारखे छंद जोपासणे गरजेचे आहे.

अनेकदा आपले वडीलधारी सल्ला देतात, मन मोकळे करा, मोकळे ठेवा जेणेकरून नवीन कल्पना, विचार आणि उपाय मनात येतील. सध्याच्या काळात ‘तो/ती माझा फायदा उचलेल, दुरुपयोग करून, विश्वासघात करीन’ या विचारांच्या किंवा असा समाज करून आपण सगळ्या गोष्टी मनातच ठेवतो आणि त्याची अधोगती सुरू होते.

तुमचे आहे ते कुणी घेऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्हाला वाईट अनुभव येणार नाही असे नाही, परंतु एका चुकीच्या उदाहरणामुळे आपण सगळे तशीच समजून आपलेच नुकसान करून घेतो. विद्यार्थी असल्यास भविष्यातील मार्गांची चर्चा करा.. मित्रांसोबत, मोठ्यांसोबत... मन मोकळे करा.. मार्ग सापडेल.. व्यावसायिक, नोकरदार असाल तर सल्ला घ्या, सल्ला द्या..

ज्याला जे घ्यायचे तो ते घेतील आणि करील परंतु शर्यतीत पुढे जायचे असल्यास दुसऱ्यावर पाय देऊन नाही तर त्याला हात देऊनच जाता येईल. करिअर घडवणे हे ‘रिले रेस’ सारखे आहे, मनात कुठली शंका ना ठेवता ‘बॅटन’ आपल्या सहकाऱ्याला देऊन पुढे चला.

‘एम एस धोनी - अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील एक किस्सा पंजाब विरुद्ध झारखंडची मॅच, युवराज सिंगचा एक वेगळाच करिष्मा, त्याला बघून झारखंडचे खेळाडू स्तंभित, आणि मग धोनी ही मॅच आपण मैदानावर नाही तर मैदानाबाहेर हरलो... म्हणजे.. मनात शंका-युवराज एवढा मोठा खेळाडू आपण कसे जिंकणार आणि नंतर धोनीने जो इतिहास घडवला तो सगळ्यांना माहीतच आहे.

मानसिक ताण जेवढा कमी करता येतील आणि त्यासाठी लागणारे कौशल्य मग ते पुस्तके वाचन, खेळणे किंवा छंद जोपासणे असो.. बिनधास्तपणे आपले मत, मन शेअर करा, मोकळे ठेवा आणि बघा गंमत. करिअरच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.