स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात. पात्रे : तीनच! खोली अंधारी आहे. टोटल काळोख. काळोखात तीन खुर्च्या. कुणीतरी चाचपडत येतं. धडपडल्याचे आवाज. ओय ओय, असे विव्हळण्याचे आवाज. काही भेदक शब्दांचा उच्चार.
दादासाहेब : (हातातल्या मोबाइल टॉर्चचा उपयोग करत) कोण? भाईसाहेब का? वाटलंच मला! अहो, केवढ्यांदा पाय दिलात माझ्या पायावर! बोंबलायची पाळी आली!!
भाईसाहेब : (शेजारच्या खुर्चीत बसत) सॉरी…अंधारात दिसलं नाही! चुकून पाय पडला! मला काय माहीत की तुम्ही सगळ्यांच्या आधी येऊन बसाल म्हणून?
दादासाहेब : (पाय कुरवाळत) कुठंतरी पैला नंबर लावलेला बरा, म्हणून लौकर आलो! अरारारा, लईच दुखायला लागलाय पाय! परवा कुणीतरी छावा बघताना थेटरात असाच पाय दिला! त्याच पायावर तुम्ही आज पुन्हा पाय दिला! अगागागा!!
भाईसाहेब : (हात झटकत) ‘छावा’ बघायला मी आलोच नव्हतो! मी आधीच बघून टाकला होता.
दादासाहेब : (वैतागून) मुद्दा ‘छावा’चा नसून पायाचा आहे! मी पहिले येऊन पहिल्या खुर्चीत येऊन बसलो, हेच चुकलं! आता जो येईल तो पायावर पाय देऊन जाणार!! वैताग आहे नुसता!!
भाईसाहेब : (समजूत घालत) रागावू नका, दादासाहेब! अंधारात असं व्हायचंच!! लोक संधी साधून कुणाकुणाच्या मांडीवर बसतात! आपलं तसं तर झालं नाही? नशीब समजा!!
दादासाहेब : (पाय कुरवाळत) ओय ओय ओय! तुमचा पाय बुटासकट पडला! भलताच भारी आहे बुवा! कळ येत्येय!!
भाईसाहेब : (दाढी कुरवाळत) तरी मी जवळजवळ रोज सांगतोय की मला हलक्यात घेऊ नका म्हणून!! आता पडला ना पाय?
दादासाहेब : (विषय बदलत) पण आज ही आपली अर्जंट गुप्त मीटिंग का लावली आसंल?
भाईसाहेब : (शेजारच्या खुर्चीत बसून खांदे उडवत) आले नानासाहेबांच्या मना, तेथे काही कुणाचे चालेना!! मला काय, मीटिंगचा निरोप मिळाला, लगेच आलो!! हल्ली मला बराच रिकामा वेळ असतो…
दादासाहेब : (पायाकडे बघत) मलाही!!
नानासाहेब : (तडफेनं खोलीत येत) मला उशीर नाही ना झाला? सगळी कामंधामं आटोपून आलो…
दादासाहेब : (सावध होत) एक मिनिट, मला उठून उभं राहू द्या, नाहीतर तुम्हीही माझ्या पायावर पाय देऊन पुढे जाल!!
नानासाहेब : (सराईतपणे चालत) त्याची गरज नाही, मला अंधारातही स्वच्छ दिसतं!! चाचपडण्याचे दिवस आता गेले, दादासाहेब!!
भाईसाहेब : (खुर्चीवरुन उठत) इथं बसता?
नानासाहेब : (रिकाम्या खुर्चीत स्थानापन्न होत) असू दे! तुम्ही बसला काय, मी बसलो काय, एकच आहे!!
भाईसाहेब : (गलबलून येत) थँक्यू!!
दादासाहेब : (ईर्ष्येने पेटून) एकदा तुमची खुर्ची मला का देऊन बघत नाही, नानासाहेब? बघावं तेव्हा तुमच्यातच खुर्च्यांची अदलाबदली होतेय, मी बाजूला पर्मनंट बसलोय!!
नानासाहेब : (डोळा मारत) वो तुम नहीं समझोगे! हमारा और भाईसाहेब का अलग रिश्ता है…हो की नाही भाईसाहेब?
भाईसाहेब : (कृतज्ञतेनं भारावून) हो, हो, हो! अब रुलाओगे क्या तुम!! टीम तीच आहे, फक्त खुर्च्यांची अदलाबदली झालीय!!
दादासाहेब : (कडवटपणाने) हे खुर्चीचं प्रकरण फारच मनाला लावून घेतलंय, तुम्ही भाईसाहेब! खुर्ची काय आज आहे, उद्या नाही!..
नानासाहेब : (चातुर्यपूर्ण रितीने) तुम्हीही नका लावून घेऊ मनाला, दादासाहेब! वेळ आली की करु अदलाबदल! खुर्ची लागली तरी चालेल, पण आपल्यात मिर्ची लागायला नको, एवढंच! हो की नाही?