Irregular Or Unhealthy Eating Habits Cuase Bloating: लहान मुलांनाच नाही तर सर्वांनाच फुगे आवडतात आणि गॅस भरलेला फुगा तर सर्वांनाच खास आकर्षण! पण गॅस भरून पोटाचा फुगा किंवा नगारा झालेला कोणालाच आवडत नाही. या गॅसमुळे प्रत्यक्ष शरीर जरी वर उचलले गेले नाही तरी एक ना एक दिवस जीव वर स्वर्गात अवश्य जातो. खूप गॅस असल्यानंतर छातीत दुखते. पण म्हणून खरोखर हृदयरोगामुळे छातीत दुखले तरी "काय साधा गॅस तर आहे' असे म्हणत राहण्याने भलत्याच प्रसंगाला तोंड द्यावे लागते.
पोटात गॅसचा गुबारा धरणे याचे जेवढे संकट आहे त्यापेक्षा मोठ्या संकटास आणि लाजिरवाण्या परिस्थितीस तो गॅस बाहेर जाताना तोंड द्यावे लागते. अर्थात ही अपान क्रिया अधोगामी झाली तर त्यातल्या त्यात बरे, पण ऊर्ध्वगामी झाल्यास हृदयाचे, डोळ्यांचे व मेंदूचे बरेच नुकसान होते. सरणाऱ्या अपान वायूस प्रत्येक वेळा दुर्गंध असतोच असे नाही. शरीरात साठलेला आमदोष किंवा कडक झालेल्या स्नायूवर दाब दिल्यावर चलित झालेला वायूसुद्धा अपानमार्गे किंवा ढेकर येऊन बाहेर जातो. पोटात वायू धरण्याची अनेक कारणे असू शकतील. पण वातूळ पदार्थ खाण्याने वायूचा त्रास नक्कीच होतो. पावटा, वाटाणा, वांगी अशा काही वातूळ पदार्थांचा अनुभव सर्वांनाच असतो.
पोटात गॅस धरणे ही क्रिया पूर्णांशाने अपचनावरच अवलंबून असते. लोखंडाचे चणे पचवणारे लोक कथा-कादंबऱ्यांतच राहून गेले. सध्या साध्या पाण्याचेही अपचन होते. या अपचन होण्यापाठीमागे केवळ व्यक्तीचा किंवा त्याच्या पोटाचा दोष नसून पाण्याचाही मोठा दोष सध्या दिसून येतो. ताजे, स्वच्छ, खळाळणारे पाणी जाऊन त्याजागी चार वेळा ठिकठिकाणी अंधाऱ्या टाकीत साठवून ठेवलेले व क्वचित गंजलेल्या फुटक्या नळातून वाहणारे पाणी सध्या प्यावे लागते आणि त्या पाण्यासाठीही भलतेच पैसे मोजावे लागतात.
बहुतेक सर्व अन्नप्रकार, जास्त उत्पन्न मिळण्यासाठी वापरलेली रासायनिक खते व औषधनाशके वगैरे वापरण्याने, सहज पचतील असे राहतच नाहीत. त्यातून स्वयंपाक करण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे, स्वयंपाकात अति प्रमाणात मसाले वापरल्याने व स्वयंपाक करण्याची पद्धत योग्य नसल्याने व तो करताना प्रेम न दिल्यामुळे अपचन वाढण्यास मदत होते. स्वतःला आवडणारे व चटकन-पटकन कोपऱ्यावर मिळणारे पदार्थ खाण्यामुळे पचनाला अडथळा उत्पन्न होतो. एकूण अपचन हे सध्याच्या आधुनिक राहणीमानाचे फलित आहे!
सध्या मेहनतीची बाहेर उघड्यावर करायची कामे कमी झालीत, दिवसेंदिवस वातानुकूलित खोलीत बसून करण्याची कामे वाढलीत, पैशांची सुबत्ता असल्याने नको त्या ऋतूत नको त्या वस्तू जगभरातून कोठूनही उपलब्ध होऊ लागल्या आणि एकूणच खाणे वाढले. परंतु पचनशक्ती कमी कमी होत गेली. पदार्थात असलेले भौतिक गुण, त्यात असलेली शक्ती, जीवनसत्त्वे व मिनरल्स यावर भर दिला गेला.
परंतु कोणतेही पदार्थ सेवन करताना, खाणाऱ्याची प्रकृती, वात-पित्त-कफदोष, सप्तधातू, पाचकाग्नी, अन्नरस, सरतेशेवटी खाल्लेल्या अन्नाचे पचनानंतर कोणते परिणाम होतात (म्हणजे त्याचा विपाक काय होतो) याचा विचार होणे आवश्यक आहे. अन्न शिजवण्याची पद्धत, त्या वेळची स्वच्छता, अन्न शिजवताना त्यात ओतलेले प्रेम, योग्य वेळी छान वातावरणात बसून सावकाश व्यवस्थित घेतलेले जेवण या सर्व गोष्टींची पण पचनास मदत होते.
पचन सोपे होण्यासाठी सर्व नियम व्यवस्थित पाळले, मीठ लावून आल्याचा तुकडा चघळला, पाचक लवणं खाल्ली तरी मानसिक अवस्थेवरसुद्धा पचनक्रिया अवलंबून असते. खोटे-नाटे निर्णय, चुकीची कार्यपद्धती, दुसऱ्याचा द्वेष, स्वतःविषयी बडेजावी कल्पना बाळगणाऱ्यांना पचनाचा त्रास होतो; तसेच दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करून, चोऱ्यामाऱ्या करून, कष्ट न करता मिळवलेले अन्न सहसा पचत नाही.