आयसीसीने बुधवारी 12 मार्चला नवी रँकिंग जाहीर केली आहे. या एकदिवसीय क्रमवारीत कर्णधार रोहित शर्माला फायदा झाला आहे. तर विराट कोहली याची एका स्थानाने घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला मिस्ट्री स्पिनर म्हणून गेल्या काही महिन्यात आपली छाप सोडणाऱ्या वरुण चक्रवर्ती याने तर धमाका करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. वरुणला रँकिंगमध्ये तगडा फायदा झाला आहे. वरुणने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणने गेल्या आठवड्यात तब्बल 100 स्थानांपेक्षा अधिक मोठी झेप घेतली होती. वरुण आता ताज्या आकडेवारीनुसार कुठे आहे? हे जाणून घेऊयात.
वरुण चक्रवर्ती आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.वरुण आणि वेगवान गोलंदाज मोहम्मदशमी या दोघांनी भारतासाठी प्रत्येकी 9-9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वरुणने शमीच्या तुलनेत कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत आणि न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सान्यातही चिवट बॉलिंग केली होती. वरुणला त्याचाच फायदा वनडे रँकिंगमध्ये झालाय.
वरुण आता आयसीसी वनडे रँकिंगमध्ये 402 रेटिंग पॉइंट्ससह थेट 80 व्या स्थानी पोहचला आहे. वरुणने 16 स्थानांची झेप घेतली. वरुण आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएलमघ्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. वरुण आयपीएलच्या 18 व्या मोसमात कोलकाताकडून खेळणार आहे. वरुणने गेल्या हंगामात 15 सामन्यांमधील 14 डावांमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या.
वरुणने करुन दाखवलं
वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून पदार्पण केलं. त्यानंतर वरुणची अखेरच्या क्षणी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीत मिळालेल्या संधीचं सोनं करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वरुणने आतापर्यंत 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे वरुणने एकदा 5 विकेट्सही घेतल्या. तसेच वरुणने 18 टी 20i सामन्यांमध्ये 33 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवलाय.