पाली : सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली ही संस्था गेली अनेक दशकांपासून रायगडसह नवीमुंबईत ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत वसंतराव ओसवाल यांच्या निधनानंतर संस्थेचे अध्यक्षपद हे रिक्त झालेले आहे. मात्र संस्थेचे अध्यक्षपद हे निवडत असताना गटतट, पक्षीय राजकारण किंवा निवडणूक असे कोणतेही प्रकार न करता संस्थेचे अध्यक्षपद निवडले जावे. तसेच सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष व शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांचे नातु रविंद्र लिमये यांनी केले असून याबाबत विस्तृत प्रसिद्धीपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.
शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी सन १९४१ मध्ये लावलेल्या या शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झालेले आहे. रविंद्र लिमये यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की संस्थेचे सभासद, संस्थेचे संचालक मंडळ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व हितचिंतक यांच्या सर्वानुमते संस्थेचे अध्यक्षपद हे निवडले जावे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा वारसा हा निरंतर सुरू राहिला पाहिजे.
त्यांनी केलेल्या योगदानाचा व त्यागाचा विचार करून व मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याचा असलेल्या अनुभवाच्या शिदोरीवर आगामी काळात मी संस्थेचे अध्यक्षपद सक्षमपणे स्वीकारण्यास इच्छुक आहे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचा वारसा मी जपणार असल्याचे सूतोवाच रविंद्र लिमये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. पालीतील प्रतिष्ठित व सर्वसामान्य नागरिकांनी देखील समाज माध्यमांवर पोस्ट टाकून रविंद्र लिमये यांना पाठिंबा दर्शवला आहे.
निवड प्रक्रिया संस्थेच्या घटनेप्रमाणे संस्था अध्यक्षांची निवड ही सर्वसाधारण सभेमध्ये ठरवावी असे आहे. काही कारणानी अध्यक्षपद रिक्त झाल्यास संचालक मंडळाने अध्यक्ष अगर इतर पदाधिकारी निवडावा व त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे अध्यक्षाची निवड करणे व इतर विषयांबाबत विचारविनीमय करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2025 रोजी सभा निश्चित करण्यात आली होती. परंतु त्या सभेस संचालक मंडळातील सभासदांनी गैरहजेरी लावली व कोरम अभावी सभेमध्ये निर्णय होऊ शकला नाही. त्यामागील उद्देश समजू शकला नाही.
त्यामुळे पुनःश्च संचालक मंडळाची सभा आयोजित करून संस्था हिताच्या दृष्टीने पुढील वाटचाल करण्याच्या कामी निर्णय एकतर्फी न घेता सर्वांची मते, प्रतिक्रिया व अभिप्राय जाणून घ्यावे. तसेच शिक्षण महर्षी कै. दादासाहेब लिमये व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विचार करावा व मला पुढील कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून निवड करून काम करण्याची संधी दयावी असे मत रविंद्र लिमये यांनी मांडले आहे.