विरार - वसई विरार हे सद्य तरुणाईला नशेच्या आहारी नेणाऱ्या अमलीपदार्थाच्या विळखत अडकली जात आहे. गेल्या महिन्याभरात या ठिकाणी चारवेळा अमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून अमलीपदार्थ हस्तगत केली आहेत.
याच धरतीवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत एका महिलेसह अन्य दोन आरोपीला गर्द या अंमली पदार्थसह अटक केली आहे. ज्याची बाजारात किंमत १ कोटी ८ लाख रुपयांमध्ये आहे. रंगपंचमीच्या पहाटे इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिळाल्याने वसईत खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या म्हाडा परिसरातील रस्त्यावर शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या वेळी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दोन पुरुष व एक महिला संशयास्पद दिसून आले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतल्यावर तिन्ही आरोपींकडून १ कोटी ८ लाख १० हजार रुपये किंमतीचे २५७ ग्रॅम गर्द हे अंमली पदार्थ मिळून आले आहे. आरोपींनी अंमली पदार्थ व्यावसायिक प्रमाणात विक्रीसाठी बाळगला असल्याचे सूत्रांकडून कळते. आरोपी समीर साहेब (२८), जास्मिन युनूस (२६) आणि परवीन या तीन आरोपींविरुद्ध बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नमुद गुन्हयाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे अधिक तपास करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे. पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे व पाठक, पोलीस हवालदार इंगळे, टक्के, पाटील, आव्हाड, पागधरे, घेरे, महिला पोलीस हवालदार लतादेवी एक्कादेवी यांनी केली आहे.