Amit Deshmukh : राजकीय समतोल राखण्यासाठी मविआत; अमित देशमुख, आमदार विक्रम काळेंची महायुतीत येण्याची ऑफर
esakal March 16, 2025 08:45 PM

लातूर : तुमच्या सारखा एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे ही आमची व मंत्री संजय बनसोडे यांची इच्छा आहे. हा योग लवकर यावा. सांस्कृतिक मंत्री म्हणून तुम्ही चित्रपट महोत्सव घ्यावा हे लातूरकरांनी पाहावे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना महायुतीत येण्याची ऑफर दिली.

यावर राजकीय समतोल राखण्यासाठी मी महाविकास आघाडीत आहे. तिथेच आनंदी आहे, असे प्रत्युत्तर देशमुख यांनी त्यांना देताच उपस्थितांत हशा पिकला. येथे शुक्रवारपासून (ता.१४) विलासराव देशमुख फाउंडेशन, पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली.

यावेळी हे तिन्ही नेते व्यासपीठावर होते. एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे. आमची व संजय बनसोडे यांची खूप इच्छा आहे. गरज पडली तर जब्बार पटेल बसले आहेत ते सुद्धा सांगू शकतात.

सांस्कृतिक मंत्र्यांनी हा महोत्सव आयोजित केला असे लातूरकरांना वाटावे, असे आमदार काळे यांनी सांगत आमदार अमित देशमुख यांना एक प्रकारची महायुतीत येण्याची ऑफर दिली. तसेच, बनसोडे यांनी या महोत्सवाचे कौतुक केले. राजकीय भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले. काळेंच्या भाषणावर आमदार अमित देशमुख यांनी देखील तितक्याच मिश्कीलपणे प्रत्युत्तर दिले. राजकारणातील समतोल राखला जावा म्हणून मी मविआत आहे. सत्तेच्या तराजूत एका पारड्यात गर्दी झाली तर तो समतोल राखला जाणार नाही. मी जिथे आहे तिथे आनंदी आहे.

विक्रम काळे हे नेहमीच येथे येऊन चित्रपट निर्मिती करतात. तेच दिग्दर्शक, निर्माते, पटकथाकार आणि अभिनय करतात. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. भविष्यात तुम्हीच कदाचित इकडे याल, कारण समतोल फार बिघडला तर तो बरोबर राहिला पाहिजे, असे आमदार देशमुख म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.