पुणे : पुण्यात अनेक मारहाणीच्या घटना सतत समोर येत आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी पुण्यातील येरवडा परिसरात हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावावर रंग टाकल्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने वार केल्याचा संतापनजनक प्रकार समोर आला आहे. ऋतिक मनोहर ननावरे (वय २२) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोयत्याने हल्ला केल्याची घटना धुलीवंदन दिवशी रात्री साडेआठ वाजता ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संगमवाडी येथे घडली. फिर्यादी ऋतिक याचा भाऊ रोहित ननावरे (वय १७) हा धुलीवंदनादिवशी राजीव गांधीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी २ तरुणांनी त्याला जबरदस्तीने रंग लावून त्याच्या डोक्यावर अंड फोडलं. ही बाब रोहीत याने त्यांच्या भावाला येऊन सांगितली.
त्यानंतर भावावर रंग टाकल्याचा जाब विचारायला गेलेल्या ऋतिकवर हल्ला करण्यात आला. बबल्या आणि त्याचा मित्र या दोघांनी मिळून ऋतिक याला मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले तसेच त्या दोघांनी ऋतिकच्या पोटात दगड घातला. या हल्ल्यात ऋतिक जखमी झाला आहे.
कोयत्याने हल्ला झाल्याच्या घटनेची माहिती पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी ऋतिकने पोलीस स्टेशन गाठलं, पण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलेल्या ऋतिक याला पोलिसांनी 'रंगपंचमीची करतो का?' असा उलट प्रश्न विचारला आणि पोलिसांनी त्याची तक्रार घ्यायला उशीर केला, अशी माहिती स्वतः ऋतिक याने दिली आहे.